फोटो सौजन्य - नवराष्ट्र
नवी मुंबई -सिद्धेश प्रधान :- आगामी काळात नवी मुंबई महापालिकेवर भाजपाचीच सत्ता येणार आहे. युती झाली तरी नवी मुंबईचा महापौर मीच ठरवणार असा ठाम वनमंत्री गणेश नाईक यांनी बोलून दाखवला. १०१ सेवाभावी सामाजिक उपक्रमांच्या पंधरवडया अंतर्गत कार्यक्रमांचा समारोप व मंत्री नाईक यांच्या सुवर्णवर्षे अविरत कार्याच्या गौरवार्थ वाशी सिडको एक्झिबिशन सेंटर सभागृहात संपन्न झाला यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी खासदार डॉ. संजीव नाईक, माजी स्थायी सभापती संपत शेवाळे, प्रभाकर भोईर, शशिकांत राऊत, अंजली वाळुंज, दयावती शेवाळे, लता मढवी, फशीबाई भगत, वैजयंती भगत, रुपाली भगत आदि आजी-माजी नगरसेवक आणि नगरसेविका व्यासपीठावर उपस्थिती होते.
दरम्यान, आगामी काळात वा निवडणुकांत मतदारांनी सावध राहण्याच्या व कोणत्याही आमिषाला व भूलथापांना बळी न पडण्याचा सल्ला दिला. नवी मुंबईकरांच्या भविष्यातील जलसमृद्धीसाठी कर्जत तालुक्यातील पोशिर धरणातून ५०० एमएलडी पाणी घेण्याचे प्रयत्न सुरु असून त्यासाठी पालिकेला अंदाजे ४ हजार कोटी रुपये मोजावे लागतील असे नाईक यांनी सांगितले. तसेच 14 गावांचा समावेश नवी मुंबईत केलं मात्र आम्हाला विचारले देखील नाही. मी इतके वर्ष या जिल्ह्याचे नेतृत्व केले आहे. मला पचत नाही असे म्हणतात मात्र मला पटत नाही म्हणून बोलतोय असे गणेश नाईक म्हणाले. या गावांच्या नियोजनासाठी 6 हजार कोटींचा खर्च येणार आहे.कोणी जबरदस्ती करत असेल तर त्यास मी विरोध करणार असे नाईक म्हणाले.
निवडणुका आल्या की नागरिकांना पार्ट्या देणे, पैसे देणे, यात्रा काढणे सुरू होईल. मात्र आजपर्यंत नवी मुंबईकरांनी आम्हाला साथ दिली आहे यापुढेही देतील असे नाईक म्हणाले.भाजपाच्या कार्यकर्त्यांचा सन्मान झाला तर मी नक्कीच युतीसाठी तयार असेन मात्र सन्मान न झाल्यास मीच युतीला विरोध करेन असे नाईक यांनी ठामपणे सांगितले.
तसेच नवी मुंबई कोणाची आहे हे जनतेला माहीत आहे. उद्या ते म्हणतील अमेरिका आमची आहे तर चालणार आहे का ? असे म्हणत त्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ’नवी मुंबई एकनाथ शिंदेंची आहे’ या केलेल्या उल्लेखाचा खरपूस समाचार घेतला. येत्या ३ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देण्या संबंधी बैठक होणार असल्याचे नाईक म्हणाले. या कार्यक्रमाचे आयोजक दशरथ भगत यांनी आपल्या मनोगतात गणेश नाईक यांच्या आजवरच्या सामाजिक, राजकीय कारकिर्दीचा धावता आढावा सादर केला. मोरबे धरण खरेदी व त्याची उपयुक्तता सांगताना या धरणाला श्रीगणेश सरोवर असे नाव द्यावे व हा परिसर तिर्थक्षेत्र असल्याच्या भावना व्यक्त केल्या.