विसर्जन मिरवणुकीच्या वादावर संयुक्त बैठक कधी? गणेश मंडळांचे पदाधिकारी म्हणतात...
पुणे : महाराष्ट्रात गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जातो. 10 दिवस चालणारा हा सण आनंद आणि उत्साहाचं वातावरण निर्माण करतो. गणेशउत्सवाला सुरुवात होण्यास काही दिवसचं शिल्लक राहिले आहेत. राज्यातील प्रत्येक गणेश मंडळे गणेशत्सोवाच्या तयारीला लागले आहे. पुण्यातही गणेशत्सवासाठी लगभग सुरु आहे. अशातच आता पुण्यातील विसर्जन मिरवणुकीच्या वादावर संयुक्त बैठक कधी हाेणार? असा प्रश्न आता गणेश मंडळांना पडला आहे. या वादावर ताेडगा काढण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर माेहाेळ हे पुढाकार घेणार का ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
गणेशाेत्सव सुरु हाेण्यापुर्वीच विसर्जन मिरवणुकीत काेण कधी सहभागी हाेणार यावरून वाद सुरु झाले आहेत. गेल्यावर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मानाच्या गणपतीनंतर लक्ष्मी रस्त्यावरील मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाला हाेता. आता यावर्षी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आणि अखिल मंडई मंडळाने देखील मानाचे पाच गणपतीपाठाेपाठ विसर्जन मिरवणुकीत सहभागी हाेण्याचे जाहीर केले. यानंतर वाद निर्माण झाला आहे. गणेशाेत्सवाच्या पार्श्वभुमीवर पुणे पाेलीस आयाेजित गणेश मंडळांच्या बैठकीत या वादाचे पडसाद उमटले हाेते. यावर ताेडगा काढण्यासाठी पुन्हा एकदा बैठक घेण्याचे ठरले हाेते. दाेन दिवसांत ही बैठक हाेणार हाेती, परंतु अद्याप ही बैठक कधी हाेणार याचे उत्तर मिळाले नाही.
मानाच्या पाच गणपती पाठाेपाठ काेणी जायचे यावरून वाद निर्माण झाल्याने अनेक गणेश मंडळांनी सकाळी सात वाजता विसर्जन मिरवणुक सुरु करण्याची मागणी केली. तसेच काेणत्याही मंडळाने विसर्जन मिरवणुकीची परंपरा माेडू नये अशी भुमिका काही मंडळानी मांडली. आम्ही सकाळी सात वाजताच मिरवणुक सुरु करणार, असेही काही मंडळांनी जाहीर केले.
मानाचे पाच गणपती आणि प्रमुख गणपती मंडळेविरुद्ध इतर गणेश मंडळे असे चित्र सध्या निर्माण झाले आहे. यापार्श्वभुमीवर संयुक्त बैठक घेऊन मार्ग काढणे आवश्यक आहे. यासंदर्भात केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर माेहाेळ यांनी देखील आम्ही गणेश मंडळाचे कार्यकर्ते आहाेत, सर्व गणेश मंडळे एकच परीवार आहे. यातून मार्ग काढण्यासाठी निश्चितच बैठक घेतली जाईल, असे नमूद केले आहे.
गणेश मंडळांचे म्हणणे काय ?
प्रशासन आणि पाेलिसांकडून मानाचे गणपती आणि इतर गणेश मंडळांच्या दुजाभाव
एक मंडळ एकच ढाेल ताशा पथकाची अंमलबजावणी ठाेसपणे करावी
केळकर, कुमठेकर व टिळक रस्त्यावरील मंडळांना पुढे जाऊ द्यावे
सकाळी सात वाजता मिरवणूक काढण्याची परवानगी द्यावी.
लक्ष्मी रस्त्यावर आणखी मंडळांना परवानगी देऊ नये.