मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात महाराष्ट्राचा दौरा करत निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेतला. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची घोषणा होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात निवडणुकांची जोरदार तयारीही सुरू झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत 288 मतदारसंघातील उमेदवार ठरवण्यासाठी बैठकांवर बैठका होत आहेत. असे असतानाच महाविकास आघाडीत जागावाटपावरून धुसफूस सुरू असल्याचे समोर आले आहे.
महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांमध्ये गेल्या काही दिवसांपासून जागावाटपावर चर्चा सुरु आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मुंबईतील जागांसंदर्भात चर्चा सुरू आहे. पण महाविकास आघाडीतील काही जागांचा प्रश्न पूर्णपणे मिटला आहे. पण 38 जागांसाठी महाविकास आघाडीत कोणताही तोडगा अद्याप निघालेला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीत या जांगांवरून बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हेही वाचा: रव्याचा शिरा खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये बनवा सफरचंद शिरा
288 पैकी 250 जागांवर महाविकास आघाडीत एकमत झाले आहे. पण 38 जागांसाठी अद्यापही चर्चा सुरू आहे. पण यावर तोडगा निघण्याची शक्यता नसल्याने या जागांवर मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे काही जागांवर दोन तर काही जागांवर तीनही पक्षांनी दावा ठोकला आहे. त्यामुळे या जागांवरचा तिढा सुटणार की नाही, असेही विचारले जात आहे.
दरम्यान, येत्या 26 नोव्हेंबरला विधानसभेची मुदत संपत आहे. पण त्याआधीच निवडणूक होईल, असेही निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. येत्या 10 ते 20 नोव्हेंबर या काळात राज्यात एका टप्प्यातच विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात दोन टप्प्यात निवडणुका होतील, असेही काही दिवसांपूर्वी सांगितले होते.
हेही वाचा: तीन तोळ्यांची सोनसाखळी लंपास; सासरच्यांचा थेट जावयावर संशय, पोलिसांतही तक्रार