रेल्वे रुळ ओलांडणे ठरतंय जीवघेणं; पुणे रेल्वे विभागात सप्टेंबर अखेरपर्यंत 301 अपघातांची नोंद
पुणे : पुणे रेल्वे विभागात रेल्वे रुळ ओलांडताना अनेक अपघातांच्या घटना घडल्या आहेत. याची आकडेवारी आता समोर आली आहे. यामध्ये जानेवारी ते सप्टेंबर अखेरपर्यंत झालेल्या अपघातांची संख्या 301 वर पोहोचली आहे. या अपघातांमध्ये मृत्यूचे मुख्य कारण म्हणजे ट्रेनखाली येणे किंवा रुळांच्या जवळ असलेल्या व्यक्तींचा ट्रेनशी संपर्क होणे हे आहे. अनेक वेळा हे प्रकार मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवर घडतात. तसेच गाडी रुळावरून घसरणे, इतर गाड्यांशी टक्कर होणे किंवा मानवी चुकांमुळेही जीवितहानी झाली आहे. जानेवारी ते सप्टेंबर 2025 या काळात पुणे विभागातील एकूण 107 स्थानकांवर या अपघाती घटनांची नोंद झाली आहे.
या पार्श्वभूमीवर रेल्वे पुणे विभागाकडून अपघात रोखण्यासाठी विशेष पावले उचलण्यात आली आहेत. एकूण 296 जनजागृती मोहिमा राबविण्यात आल्या असून, रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) कडून प्रभावित ठिकाणी विशेष मोहीम राबविली जात आहे. ट्रेनपास करणाऱ्यांविरुद्ध १८८३ प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. तसेच धोकादायक ठिकाणी बाउंड्री वॉल बांधकामासाठी अभियांत्रिकी विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. जनजागृतीसाठी सोशल मीडियाचाही मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असल्याची माहिती रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी हेमंतकुमार बेहरा यांनी दिली.
हेदेखील वाचा : प्रवासी रेल्वे रुळांवर कसे पडले? प्रत्यक्षदर्शीने केला खुलासा, चार जणांचा मृत्यू, रेल्वे दूर्घटनेनंतर राजकारण तापले
दरम्यान, अपघात रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. रेल्वे रुळ ओलांडण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी जागोजागी फूट ओव्हर ब्रिज बांधकाम सुरू आहे. या कामाला गती देण्यात आली असून, नागरिकांनी या ब्रिजचा वापर करून अपघात टाळावेत, असे रेल्वे विभागाचे आवाहन केले आहे.
ट्रेन पकडण्यासाठी योग्य वेळेत स्टेशनवर यावे
‘अपघात टाळण्यासाठी प्रवाशांनी एफओबी (फूट ओव्हर ब्रिज) चा वापर करावा, तसेच ट्रेन पकडण्यासाठी योग्य वेळेत स्टेशनवर यावे. कोणत्याही परिस्थितीत रेल्वे रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. रेल्वे विभाग वेळोवेळी जनजागृती करत असून प्रवाशांनी तिकीट काढून प्रवास करावा,यासाठी सर्वांनी सहकार्य करणे अत्यावश्यक आहे’, असे रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी हेमंतकुमार बेहरा यांनी सांगितले.