
पन्हाळा : जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, या जय घोषाने पन्हाळगड शिवमय बनले आहे. आज, सोमवारी साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीसाठी पन्हाळगडावरून शिवज्योत नेण्यासाठी शिवभक्तांनी गडावर प्रचंड गर्दी केली होती.
पन्हाळगड या ठिकाणाहून शिवज्योत नेण्याची परंपरा आहे. पुणे, सांगली सातारा कोल्हापूरसह कर्नाटक, राज्यातील शिवभक्तांची शिवज्योत नेण्यासाठी पन्हाळगडावर दोन दिवस मोठी गर्दी झाली होती. यासाठी पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेने प्रत्येक शिवज्योत नेणाऱ्या मंडळांना मानाचा नारळ व सन्मानपत्र देण्याची व्यवस्था केली होती.
शिवमंदिर, बाजीप्रभू, शिवाकाशिद या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण विद्युत रोषणाई केली हाेती. ही रोषणाई पाहायला गर्दी झाली होती. येणाऱ्या शिवभक्तांसाठी लाईट पाणी याचीही व्यवस्था करण्यात आली होती. पन्हाळ्याहून शिवजयंतीसाठी १२०० ते १५०० शिवज्योती नेण्यात येतात.
स्वच्छता मोहिमेस प्रतिसाद
दरम्यान, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत पन्हाळा येथे सकाळी शिवमंदिरात शिवजन्मकाळ सोहळा साजरा करण्यात आला. शिवजयंती उत्सवानिमित्त घेतलेल्या रक्तदान शिबीर व स्वच्छता मोहिमेस प्रतिसाद मिळाला.