sushma andhare
नाशिक : ड्रग्ज तस्कर ललित पाटील (Lalit Patil) याला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी फोन केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केला. याप्रकरणी गृह खात्याला भुसे यांचे कॉल रेकॉर्ड तपासण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. तर अंधारे यांच्या आरोपात काहीही तथ्य नसल्याचा दावा पालकमंत्री दादा भुसे यांनी केला.
साकीनाका पोलिसांनी शिंदे पळसे येथील ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त केल्यापासून नाशिक चर्चेत आले आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यानंतर आता सुषमा अंधारे यांनी थेट भुसे यांचे नाव घेतल्याने खळबळ उडाली आहे. भुसे यांनी मात्र कोणत्याही यंत्रणेमार्फत माझी चौकशी करा, चौकशीतून सत्य बाहेर येईल, आरोप सिद्ध न झाल्यास अंधारे यांच्यावर मानहानीचा दावा करण्याचा इशारा दिला.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी एका आमदाराचा या प्रकरणात हात आहे, असे म्हटले होते. त्यानंतर काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुन्हा एकदा सांगितले की, शिंदे गटाच्या आमदाराचा यात हात आहे. याबाबतची माहिती सर्वांकडे आहे, असे सुषमा अंधारे म्हणाल्या. त्यांनी मी आता थेट माहिती घेते. मी नाव घेताना असे सांगतेय की, या सगळ्यात दादा भुसे यांच्या नावाच्या अवतीभोवती संशयाचे धुके असेल तर त्यांचे कॉल रेकॉर्ड का तपासले जात नाही? त्यांना प्रश्न का विचारले जात जाऊ नये? गृह खात्याची याप्रकरणाचा खरेच छडा लावण्याची इच्छाशक्ती असेल तर त्यांनी हा विषय स्पष्ट करायला हवा, असेही अंधारे यांनी सांगितले.
या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. कोणत्याही यंत्रणेमार्फत माझी चौकशी करा, मी चौकशीला तयार आहे. चौकशीत या आरोपांमध्ये तथ्य निघाले नाही तर सुषमा अंधारे यांच्याविरोधात मानहानीचा दावा ठोकणार आहे.
– दादा भुसे, पालकमंत्री.