Dagdusheth Halwai Ganpati Decoration 2025 Padmanabha Temple Vasa Poojan
पुणे : पुण्यातील गणेशोत्सव फक्त देशात नाही तर जगामध्ये प्रसिद्ध आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाची बीजे पेरलेल्या पुण्यामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यातील गणेशोत्सव सोहळा आणि विसर्जन मिरवणूक ही अत्यंत लोकप्रिय आहे. मानाचे गणपती आणि पुण्याचे आराध्य दैवत असलेल्या दगडूशेठ गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी लांबून भक्तगण येत असतात. दगडूशेठ गणपतीची आरास आणि डेकोकेशन हा नेहमी चर्चेचा विषय ठरतो.
पुण्यातील लोकप्रिय दगडूशेठ गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी बारामाही भाविक येत असतात. गणेशोत्सव काळामध्ये दगडूशेठ हलवाई गणपतीला केलेला भव्य देखावा हा नेत्रदीपक असतो. यंदा दगडूशेठ हलवाई गणपतीचे १३३ वे वर्षे आहे. या वर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने गणेशोत्सवानिमित्त केरळ मधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. त्या सजावटीच्या तयारी प्रारंभी वासापूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वासा पूजनाने सजावटीचा श्री गणेशा झाला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
बुधवार पेठेतील उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या जय गणेश प्रांगण येथे वासापूजन झाले. यावेळी वासाला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
भारतातील केरळ राज्याची राजधानी असलेल्या तिरुअनंतपुरम येथे भगवान विष्णूंना समर्पित असे एक हिंदू मंदिर म्हणजे पद्मनाभस्वामी मंदिर. हे मंदिर श्री वैष्णव परंपरेत श्री विष्णूंचे पवित्र निवासस्थान मानले जाणारे १०८ दिव्य देसमांपैकी म्हणजेच निवासस्थानांपैकी एक आहे. अत्यंत पवित्र असलेल्या या मंदिराची तेजस्वी प्रतिकृती यंदाच्या गणेशोत्सवात दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे साकारण्यात येत असून भाविकांकरीता विशेष आकर्षण ठरणार आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पद्मनाभस्वामी मंदिराच्या प्रतिकृतीचा आकार १२० फूट लांब, ९० फूट रंद आणि १०० फूट उंच असणार आहे. यामध्ये ३० भव्य खांब असून ५०० देवी-दैवता, ऋषीमुनी यांच्या मूर्ती असणार आहेत. गाभारा सुवर्ण रंगाने सजलेला असून संपूर्ण छताचा भाग अष्टकोनी स्वरूपात साकारण्यात येईल. मुख्य सभामंडपातील खांबांची रचना सुटसुटीत असून भाविकांना लांबून सहजतेने श्रीं चे दर्शन घेता येईल. कलादिग्दर्शक विनायक रासकर यांनी मंदिराचे काम, मंडपव्यवस्था काळे मांडववाले यांनी केली आहे.