बारामती/अमोल तोरणे : इंदापूर विधानसभा मतदार संघातील लढाईमध्ये राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये अटीतटीची लढत सुरू असून यामध्येच अपक्ष उमेदवार प्रवीण माने रिंगणात उतरल्याने इंदापूरच्या या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आप्पासाहेब जगदाळे यांच्यासह भरत शहा कोणाला साथ देणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. प्रवीण माने यांचा अर्ज मागे घेण्यासाठी दोन्ही गटातील वरिष्ठ नेत्यांचे प्रयत्न सुरू असून, माने यांची उमेदवारी कोणाच्या पथ्यावर पडणार, याची देखील सर्वांना उत्सुकता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांना हर्षवर्धन पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून मिळालेल्या उमेदवारीमुळे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. मात्र गेली दहा वर्ष इंदापूर तालुक्याचे प्रतिनिधित्व करत असताना त्यांनी ग्राउंड रूटवर काम करून सामान्यांशी नाळ जोडली आहे. त्यातच साडेपाच हजार कोटींची विकास कामे इंदापूर तालुक्यात केल्याने ही त्यांच्या जमेची बाजू आहे. तर हर्षवर्धन पाटील यांनी आपली राजकीय रणनीती बदलून शरद पवार यांचे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मांडलीत्व स्वीकारल्याने पाटील यांची राजकीय ताकद वाढली आहे, ही पाटील यांच्या दृष्टीने जमेची बाजू आहे.
दरम्यान दत्तात्रय भरणे हे सुरुवातीपासून अजित पवार यांचे बिनीचे शिलेदार आहेत. अजित पवार यांनी गेल्या अनेक वर्षांपासून दत्तात्रय भरणे यांना राजकीय ताकद देण्याचा प्रयत्न केला. गेल्या अनेक वर्षांपासून छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक असलेल्या दत्तात्रय भरणे यांना या कारखान्याचे अध्यक्षपद दिले. यानंतर पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्षपद दिले. यानंतर पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देखील केले. या अध्यक्षपदाच्या काळात दत्तात्रय भरणे यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भरघोस निधी इंदापूर तालुक्यासाठी आणला. योजनांचा लाभ त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील जनतेला दिला. साहजिकच भरणे यांची राजकीय ताकद तालुक्यात चांगलीच वाढली. त्याचा फायदा त्यांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये होऊन त्यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव करून ते अखेर आमदार झाले.
यानंतर देखील त्यांना राज्यमंत्रीपद बहाल केले. सार्वजनिक बांधकाम, वने व मृदूसंधारण या खात्यासह सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री या पदावर आमदार भरणे यांनी काम केले. दरम्यान इंदापूरच्या राजकारणामध्ये भरणे विरुद्ध पाटील हा राजकीय संघर्ष नेहमीच तीव्र होत गेला. सलग दहा वर्ष आमदारकी पासून दूर राहिलेले हर्षवर्धन पाटील यांनी विविध माध्यमातून आमदार भरणे यांना शह देण्याचा प्रयत्न केला. जिल्हा परिषद व पंचायत समितीसह ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये पाटील व भरणे संघर्ष शिगेला पोहोचला. दरम्यान मागील विधानसभा निवडणुकीपूर्वी हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमधून निवडणूक लढवून देखील त्यांचा पराभव झाला. यानंतर भाजप यांना राजकीय ताकद देईल, अशी आशा त्यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना होती.
विधान परिषदेसाठी पाटील यांना संधी मिळेल, त्यानंतर कदाचित मंत्रिपद देखील मिळेल, अशी शक्यता होती. मात्र त्यांना राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष पद देण्यात आले. मात्र राजकीय दृष्ट्या या पदामध्ये फारशी ताकद नसल्याने या पदाच्या माध्यमातून जास्त प्रभाव पाटील यांना दाखवता आला नाही. विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शरद पवार गटाचा पॉकेट वोट आपल्या हक्काच्या मतामध्ये प्लस होईल, या आशेने पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश केला.
सध्याच्या स्थितीला हर्षवर्धन पाटील यांचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्यापुढे मोठे आव्हान आहे. आमदार भरणे हे आपल्या आमदार पदाच्या काळात वाड्यावर केलेली विकास कामे याचा लेखाजोखा जनतेपुढे मांडत आहेत. दरम्यान हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील ठाकरे यांच्यासह पाटील यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील हे या निवडणुकीत वडिलांसाठी मैदानात उतरले आहेत. अंकिता पाटील या भरणे समर्थकांवर मलिदा गॅंगचा आरोप करत आहे. आमदार भरणे यांनी अंकिता यांच्या टीकेला उत्तर न देता त्या माझ्या बहिणी प्रमाणे आहेत, त्यांच्या टिकेबाबत काय बोलणार, असा सवाल करत आहेत.
दरम्यान सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये नाराज असलेले जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे अद्याप कोणाच्याच बाजूने नाहीत. तसेच इंदापूर शहरातील नेते भरत शहा हे देखील शांत आहेत. हे दोन्ही नेते कोणाच्या बाजूला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या दोघांशी संपर्क करून आमदार भरणे यांच्यासाठी सक्रिय होण्याची विनंती केल्याची चर्चा आहे. दरम्यान पूर्ण ताकतीने मैदानात उतरलेले प्रवीण माने यांची उमेदवारी सध्या पाटील व भरणे यांना टेन्शन देणारी आहे. मात्र माने यांच्या उमेदवारीचा फायदा दोघांपैकी एकाला होणार, हे स्पष्ट आहे. ४ नोव्हेंबर नंतर इंदापूर तालुक्यातील मतदारांचा कौल स्पष्ट होणार आहे. दरम्यान दोन्ही नेत्यांसह माने यांनी आपली ताकद पणाला लावली आहे.