'बोलणार नाही, हे चालणार नाही'; मराठी भाषेवरून अजित पवारांचं हिंदी भाषिकांसदर्भात मोठं विधान
हिंदी भाषेच्या सक्तीचा मुद्दा आणि मराठी भाषेच्या अस्मितेचा मुद्दा सध्या संसदेत पोहोचला आहे. दरम्यान महाराष्ट्रात सध्या मराठी व इतर भाषिकांमध्ये वाढत चाललेल्या भाषिक वादाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गैरमराठी नागरिकांना मराठी भाषेबाबत संवेदनशील राहण्याचे आणि तिचा आदर करण्याचं आवाहन केलं आहे.
अजित पवार म्हणाले की, “कोणी म्हणालं की आम्ही महाराष्ट्रात राहतो, पण फारशी मराठी बोलता येत नाही, तरी काही बिघडत नाही. पण त्यांनी एवढं तरी म्हणावं की आम्ही या राज्याच्या भाषेचा आदर करतो आणि ती शिकण्याचा प्रयत्न करू. “आपण ज्या राज्यात राहतो, तिथल्या भाषेचा थोडा तरी आदर केला पाहिजे. काही वेळा लोकांचा या विषयावर चांगला प्रतिसाद येतो, पण काही वेळा लोक उद्धट वागतात. त्यामुळे असे वाद टाळण्यासाठी भाषेचा सन्मान करणं गरजेचं आहे.”
सध्या महाराष्ट्रातील भाषिक वाद संसदेतही पोहोचला आहे. काही दिवसांपूर्वी निशिकांत दुबे यांनी “तुम्हाला पट्क पट्क के मारेंगे,” असं वादग्रस्त विधान केलं होतं. त्यावरून आज महाराष्ट्रातील महिला खासदार संतप्त झाल्या. त्यानंतर दबावामुळे दुबे यांनी “जय महाराष्ट्र” म्हणत माघार घेतली.
दुबे यांच्या विधानानंतर राज ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. हराज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मेळाव्यात, दुबे तू एकदा मुंबईथ ये, तुला पटक पटक के मारेंगे, असं म्हटलं होतं. राज ठाकरे यांनी ‘महाराष्ट्र माझा, मराठी माझी’ या भूमिकेवर ठाम राहून वारंवार सांगितले आहे की महाराष्ट्रात राहणाऱ्यांनी मराठी भाषा बोलली पाहिजे. राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे कौतुक करताना ते “माझे सैनिक” असल्याचं गौरवोद्गार काढले होते.
या वादातून राज्यात काही ठिकाणी मराठी आणि गैरमराठी भाषिकांमध्ये थेट संघर्ष झाल्याची प्रकरणं समोर आली आहेत. एका व्यक्तीने “मी मराठी बोलणार नाही, काय कराल?” असं म्हटल्यानंतर त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. दरम्यान, राज्यातील वाढत्या तणावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं, “एखाद्या भाषेवरून हिंसा करणं अजिबात योग्य नाही. मराठीचा अभिमान असावा, पण कोणत्याही प्रकारचा हिंसाचार किंवा मारहाण खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.