भंडारा: शिवसैनिक म्हणजे हिंदुत्वाचा भरलेला अंगार आहे, मात्र शिवसैनिकाची तुम्ही किंमत केली. त्याला कस्पटासमान वागणूक दिली, म्हणून तुमच्यावर आता कोणी युती करतो का, अशी अगतिक होण्याची वेळ आली, असा घणाघात शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर केला. भंडारा येथे आयोजित आभार सभेत ते बोलत होते. यावेळी मंत्री आशिष जयस्वाल, आमदार डॉ. मनीषा कायंदे, आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यासह पूर्व विर्दभातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यातील विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, बाळासाहेबांचा राम मंदीराचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर उठता बसता तुम्ही टीका करता. मात्र पहलगामध्ये लाडक्या बहिणींचे कुंकू पुसणाऱ्या पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून धडा शिकवला. आज बाळासाहेब असते तर त्यांनी मुक्तकंठाने पंतप्रधान मोदींची स्तुती केली असती पण तुम्ही हिशेब मागता. सीमेवर जिवाची बाजी लावून लढणाऱ्या लष्कराच्या जवानांबाबत संशय व्यक्त करणाऱ्यांना जनाची नाही मनाची लाज वाटायला हवी, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना फटकारले.
ते पुढे म्हणाले मुंबईवरील दहशतवादी हल्ला, साखळी बॉम्बस्फोट, संसदेवरील दहशतवादी हल्ला, पुलवामामधील हल्ला झाला. पण त्याचा हिशेब आणि जाब विरोधकांनी पाकिस्तानला विचारला नाही मात्र लष्कराला आणि पंतप्रधानांना प्रश्न विचारताय, ही जनता तुम्हाला कदापी माफ करणार नाही.
ते पुढे म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरची भूमिका जगाला पटवून देण्यासाठी केंद्र सरकारने पाठवलेल्या खासदारांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व डॉ. श्रीकांत शिंदे करत होता, त्याचा अभिमान आहे. तसेच एनडीएच्या बैठकीत ऑपरेशन सिंदूरबाबत ठराव मांडण्याची संधी तुमच्या एकनाथ शिंदेला मिळाली. शिवसैनिक म्हणजे देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती नसानसांत भरलेला हिंदुत्वाचा अंगार आहे. मात्र याच शिवसैनिकाची तुम्ही किंमत केली, त्याला कस्पटासमान वागणूक दिली. त्यामुळेच आज कोणी युती करतो का अशी अगतिक होण्याची वेळ तुमच्यावर आली, अशी खरमरीत टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठावर केली. तीन वर्षात इतके लोक का सोडून गेले, याचे आत्मचिंतन करा, असा सल्ला यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, इथल्या रामाच्या पुतळ्याला देखील काहीजणांनी विरोध केला. रामभक्तांना हरामखोर म्हणणाऱ्यांना महाराष्ट्रातील जनतेने त्यांची जागा दाखवून दिली. ५१ फूट उंचीचा प्रभू श्रीरामाचा महाराष्ट्रातील दुसरा उंच पुतळा भंडाऱ्यात होत आहे. त्यातील ऊर्जा घ्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले. ते पुढे म्हणाले की, भंडारा मतदार संघात ३५०० कोटींचा विकास निधी दिला. तो देत असताना कधीही हात आखडता घेतला नाही.
नेते कार्यकर्त्याला जेव्हा विसरतात तेव्हा त्यांची गत काय होते हे निवडणुकीत आपण सर्वांनी बघितले. कार्यकर्त्याला जपलं पाहिजे. हे व्यासपीठ शिवसैनेचे वैभव आहे आणि समोर बसलेले कार्यकर्ते शिवसेनेचे ऐर्श्वर्य आहे. मुख्यमंत्री असताना कार्यकर्ता म्हणून काम केलं आजही करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. आदर्श आमदार नरेंद्र भोंडेकरसारखा असावा, असे ते म्हणाले. अडीच वर्षांत ऐतिहासिक निर्णय घेतले. पद येतात पदं जातात पण नाव गेलं की पुन्हा येत नाही. परंतु तमाम लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख सर्वात मोठी आहे. कोणीही किती विरोध केला तरी लाडकी बहिण योजना बंद होणार नाही. आता महायुती सरकारने वीज दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
Eknath Shinde : “अबू आजमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा”, एकनाथ शिंदे यांची मागणी
सत्तेसाठी २०१९ ला मराठी माणसाचा विश्वासघात केला
बाळासाहेब म्हणाले होते माझी काँग्रेस होऊ होऊ देणार नाही मात्र त्या काँग्रेसबरोबर तुम्ही घरोबा केला. तुम्ही २०१९ ला मराठी माणसाचा विश्वासघात केला. हिंदुत्वाचा विश्वासघात केला, बाळासाहेबांच्या विचारांचा विश्वासघात केला आणि तुम्हाला मतदान केलेल्या लोकांचा विश्वासघात केला. त्यामुळे २०२२ मध्ये एकनाथ शिंदेने उठाव केला. त्याची जगातील ३३ देशांनी दखल घेतली. सत्तेतून पाय उतार होऊन ५० आमदारांनी सोबत येण्याचे धाडस केले.
कारण हा उठाव स्वत:साठी नाही तर राज्याच्या हितासाठी आणि शिवसैनिकांसाठी होता. लोकसभेपाठोपाठ विधानसभेत शिवसेनेला उबाठापेक्षा जास्त मते मिळाली. शिवसेनेने ८० जागा लढवल्या आणि ६० जागा जिंकल्या. मात्र जनतेच्या न्यायालयात जाऊ म्हणणारे १०० जागा लढून केवळ २० जागा जिंकले. कारण सत्तेसाठी तुम्ही कमरेचे सोडून डोक्याला बांधले, बाळासाहेबांचे विचार सोडले, असे खडे बोल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठाला सुनावले.