"अबू आजमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा", एकनाथ शिंदे यांची मागणी (फोटो सौजन्य-X)
Eknath Shinde on Abu Azmi in Marathi : महाराष्ट्र विधानसभेत समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी सोमवारी मुघल शासक औरंगजेबाचे कौतुक केले. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटले होते की, औरंगजेब हा न्यायप्रेमी राजा होता. त्यांच्याच कारकिर्दीत भारत सोन्याचे पक्षी बनले.’मी औरंगजेबाला क्रूर शासक मानत नाही. औरंगजेबाच्या काळात, तो धर्मासाठी नाही तर राजकारणासाठीचा लढा होता; तो हिंदू आणि मुस्लिमांमधील लढा नव्हता. औरंगजेबाने आपल्या कारकिर्दीत अनेक हिंदू मंदिरे बांधली. औरंगजेबाबद्दल चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. अबू आजमी यांच्या वादग्रस्त विधानानंतर सभागृह तहकूब करण्यात आले. याचदरम्यान आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही संताप व्यक्त केला आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या मारेकऱ्याचे म्हणजे औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्या विधानसभा सदस्य अबू आजमी यांचा आम्ही निषेध करत असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच विधानसभा सदस्य अबू आजमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विधानपरिषद व विधानसभा या दोन्ही सभागृहात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली.
दोन्ही सभागृहात निवेदन करताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांना आणि त्यांच्या शौर्याला मी मानाचा मुजरा करतो. विधानसभा सदस्य अबू आजमी यांच्यासारखी माणसं शरीराने भारतात राहतात. त्यांना देशाच्या इतिहासाशी, संस्कृतीशी कसलेही देणंघेणं नाही. औरंगजेब कसा शासक होता हे जगाला माहीत आहे. अशांची भलामण करणाऱ्यांचा आम्ही धिक्कार करतो. आपला इतिहास शौर्याचा आहे. पराक्रमाचा आहे. नऊ वर्षात 696 लढाया जिंकणारे शंभूराजे हे महापराक्रमी होते. ते उत्तम प्रशासक होते. औरंगजेबाचा खोटा इतिहास सांगण्यापेक्षा छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास अबू आजमींनी शिकावा असे त्यांनी सांगितले.
मुघल सम्राट औरंगजेब यांच्याबद्दल दिलेल्या विधानावरून राजकीय गदारोळ झाल्यानंतर आता समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. एफआयआर दाखल झाल्यानंतर अबू आझमी यांनी या प्रकरणावर पहिले विधान केले आहे. त्यांनी म्हटले की त्यांच्या विधानाचा विपर्यास करण्यात आला आहे आणि ते कोणत्याही महापुरुषाचा अपमान करण्याची कल्पनाही करू शकत नाहीत.अबू आझमी म्हणाले, ‘काल मी विधानसभेतून बाहेर पडलो तेव्हा आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या विधानावर माध्यमांनी माझे मत विचारले, ज्यामध्ये त्यांनी राहुल गांधींची तुलना औरंगजेबाशी केली होती. औरंगजेब कसा होता हे मला माहित नाही, पण अनेक इतिहासकारांनी त्याची प्रशंसा केली आहे. त्यांच्या पुस्तकांवर कधीही बंदी नव्हती. मी फक्त इतिहासकारांनी जे लिहिले आहे तेच पुन्हा सांगितले.
यासोबतच ते म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉ. बी.आर. आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहूजी महाराज यांसारख्या महान व्यक्तींबद्दल अपमानास्पद शब्द वापरण्याची मी कधीही कल्पनाही करू शकत नाही.’ पण जेव्हा राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर सारख्या लोकांनी महाराष्ट्रातील महापुरुषांविरुद्ध विधाने केली तेव्हा त्यांना संरक्षण देण्यात आले. मग माझ्या विधानावर एवढा गोंधळ का? असा सवाल अबू आजमी यांनी उपस्थित केला.