दहावी-बारावी परीक्षेच्या फॉर्म 17 भरण्यासाठी डेडलाईन आली जवळ; 31 ऑक्टोबरपर्यंत...
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावी परीक्षांसाठी खासगी विद्यार्थ्यांच्या नावनोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. विलंब शुल्कासह अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर निश्चित करण्यात आली असून, याबाबतची माहिती राज्य मंडळाने प्रसिद्ध केली आहे.
राज्य मंडळाच्या अधिपत्याखालील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये मंडळाच्या अटी व शर्तींच्या अधीन राहून खासगी विद्यार्थ्यांना नावनोंदणी करता येणार आहे. विद्यार्थ्यांनी आपला नावनोंदणी अर्ज (फॉर्म नंबर १७) आणि शुल्क भरताना राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mahahsscboard.in उपलब्ध असलेल्या सूचनांचा अवलंब करावा, असे आवाहन मंडळाने केले आहे.
खासगी विद्यार्थ्यांना अर्ज सादर करताना ऑनलाईन प्रणालीचा वापर करून अर्ज आणि शुल्क भरावे लागेल. त्यानंतर ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत, शुल्क भरल्याची पोचपावती (दोन छायाप्रती) तसेच आवश्यक मूळ कागदपत्रे, अर्जावर नमूद केलेल्या शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयात सादर करणे बंधनकारक आहे. ही प्रक्रिया १६ ते ३१ ऑक्टोबर २०२५ दरम्यान पूर्ण करावी लागणार असून, या कालावधीनंतर उशिरा सादर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
दरम्यान, राज्य मंडळाने विद्यार्थ्यांना वेळेत अर्ज भरण्याचे आणि आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या मुख्य परीक्षेत सहभागी होण्यास कोणतीही अडचण निर्माण होऊ नये. तसेच मंडळाने शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना खासगी विद्यार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी काटेकोरपणे करण्याचे निर्देश दिले आहेत.
20943 खेळाडूंना मिळाले सवलतीचे गुण
खेळाडू, एन.सी.सी. व स्काऊट गाईड असलेल्या राज्यातील २० हजार ९४३ खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण मिळाले आहेत. राज्यात अशाप्रकारे गुण मिळविणारे सर्वाधिक विद्यार्थी हे मुंबई विभागात असून ही संख्या ४ हजार ७७१ इतकी आहे. तर सर्वात कमी सवलतीचे गुण प्राप्त करणारे विद्यार्थी हे कोकण विभागात असून, ही संख्या १ हजार १९१ इतकी आहे.