'या' भागात मीटर आधारित टॅक्सी सेवेसाठी १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत, प्रताप सरनाईक यांचा निर्णय
मुंबई : वसई – विरार महानगरपालिका क्षेत्रात १५ नोव्हेंबरपर्यंत टॅक्सी, रिक्षा चालकांना मीटरवर आधारित सेवा सुरू करण्यासाठी मुदत देण्यात येत आहे. या क्षेत्रात मीटरवर आधारित टॅक्सी, रिक्षा सेवा १५ नोव्हेंबरपासून सुरू करावी, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. मंत्रालयात वसई – विरार महापालिका क्षेत्रातील वाहतूक कोंडी सोडविण्याबाबत आयोजित बैठकीत मंत्री प्रताप सरनाईक बोलत होते.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, वसई – विरार महानगरपालिका क्षेत्रात शेअर टॅक्सी सेवेला परवानगी आहे. टॅक्सी, रिक्षा चालकांनी प्रवाशांची लुबाडणूक करू नये, प्रवाशांच्या तक्रारी आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. वसई – विरार महानगरपालिका क्षेत्रातून महामंडळाने ठाणे, कल्याण मार्गावर लांब पल्ल्याची बस सेवा सुरू करावी. प्रवाशी संख्या लक्षात घेता शहर बस वाहतूक पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावी. महापालिका क्षेत्रात असलेल्या महामंडळाच्या जागांचा पार्किंग जागांसाठी उपयोग करावा, यासाठी जागा लागल्यास महानगरपालिकेने जागेचे नियोजन करावे, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.
वसई – विरार महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या विरार, वसई, नालासोपारा येथे बस डेपो सुरू करावेत. नागरिकांना परिवहन सेवा सुलभरित्या मिळावी, याबाबत महानगरपालिकेने कार्यपद्धती ठरवून अंमलबजावणी करावी, असे निर्देशही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.
तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाच्या पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करावे. जिल्ह्याच्या भौगोलिक विस्ताराचा विचार करून त्या प्रमाणात बसेस देऊन परिवहन सेवा सक्षम करावी, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.
मंत्रालयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एस.टी. महामंडळाशी सबंधित विविध विषयांबाबत बैठक झाली. त्यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक बोलत होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, वेंगुर्ला आणि कुडाळ आगाराला पाच बसेस देण्यात याव्यात. ओरोस येथील प्रवासी संख्या व शासकीय कार्यालये लक्षात घेता बस स्थानकाचा विस्तार करावा. बस स्थानकाचा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) तत्वावर विकास करून प्रशस्त बसस्थानकाची निर्मिती करावी.
कार्यरत कर्मचारी संख्या आणि बसेसची संख्या लक्षात घेऊन नियोजन करावे. कर्मचाऱ्यांअभावी बसेस थांबून प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यावी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विभागीय नियंत्रक रिक्त पदावर अधिकारी देण्यात यावा, असे निर्देशही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.