Pro Kabaddi League 11 : दिल्ली संघाची दबंगगिरी पुन्हा सिद्ध; गुजरात संघावर शानदार विजय
पुणे : सामन्याच्या ११ व्या मिनिटाला चार गुणांनी पिछाडीवर असलेल्या दबंग दिल्ली संघाने गुजरात जाएंट्स संघाला ४५-३१ असे हरविले आणि प्रो कबड्डी लीग मधील प्ले ऑफ मध्ये आणखी एक महत्त्वपूर्ण विजय नोंदविला. मध्यंतराला दिल्ली संघाकडे तीन गुणांची आघाडी होती.
पुण्याचा २१ सामन्यांपैकी बारा लढतींमध्ये विजय
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत दबंग दिल्ली संघाने यापूर्वीच प्ले ऑफ मध्ये स्थान मिळवले आहे त्यांनी यापूर्वी झालेल्या २१ सामन्यांपैकी बारा लढतींमध्ये विजय मिळवला आहे आजच्या लढतीत दिल्लीचे पारडे जड राहील अशी अपेक्षा होती. प्ले ऑफ मध्ये अव्वल स्थान मिळवण्यासाठी ते प्रयत्न करतील असा अंदाज होता. गुजरात संघाने २१ सामन्यांपैकी फक्त पाचच सामने जिंकले असून प्ले ऑफ मध्ये स्थान मिळवण्याच्या त्यांच्या आशा यापूर्वी संपुष्टात आले आहेत. मात्र उर्वरित सामन्यांमध्ये विजय मिळत यंदाच्या स्पर्धेची यशस्वी सांगता करणे हेच त्यांचे मुख्य ध्येय होते.
पहिल्या लोणनंतर दिल्लीचे खेळाडू जागे
गुजरातच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच नियोजनबद्ध खेळ करीत धमाकेदार सुरुवात केली त्यांनी नवव्या मिनिटालाच दिल्ली संघावर लोण चढवत खळबळ उडवून दिली. त्यावेळी त्यांच्याकडे १०-५ अशी आघाडी आली होती. मात्र लोण स्वीकारल्यानंतर दिल्लीचे खेळाडू खडबडून जागे झाले असावेत कारण त्यांनी अष्टपैलू खेळ करीत चौदाव्या मिनिटाला पहिला लोण नोंदविला आणि १५-१४ अशी आघाडी मिळविली. त्याचे मुख्य श्रेय कर्णधार आशु मलिक व नवीन कुमार यांच्या चौफेर चढायांना द्यावे लागेल. मध्यंतराला त्यांनी २०-१७ अशी आघाडी घेतली होती.
उत्तरार्धात दिल्ली संघाने सामन्यावरील पकड कायम कशी राहील हेच डावपेच केले आणि सातत्याने आपल्याकडेच आघाडी ठेवली. गुजरात संघाच्या कर्णधार गुमान सिंग, जितेंदर यादव व राकेश यांनी सुरेख खेळ करीत त्यांना चांगली झुंज दिली. मात्र पुन्हा अक्षम्य चुका करीत त्यांनी ३१ व्या मिनिटाला आणखी एक लोण स्वीकारला. त्यावेळी दिल्ली संघाकडे सात गुणांची आघाडी होती. शेवटची पाच मिनिटे बाकी असताना त्यांच्याकडे ११ गुणांची आघाडी आली होती. शेवटचे दीड मिनिट बाकी असताना त्यांनी आणखी एक लोण नोंदवित एकतर्फी विजय निश्चित केला.