‘जयभीम’च्या घोषणांनी दुमदुमली रात्र; आदर्श शिंदेंच्या भीमा गीतांनी वातावरण भारावले
आदर्श शिंदे हे आपल्या दमदार आवाजातील भीमगीतांसाठी (Bhim Geet) विशेष ओळखले जातात. त्यांच्या गाण्यांनी आंबेडकरी अनुयायांमध्ये, विशेषतः युवा पिढीत प्रचंड उत्साह आणि चैतन्य निर्माण केले आहे.
कार्यक्रमस्थळी आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात आलेला भव्य मंच, उत्कृष्ट ध्वनीव्यवस्था आणि शिस्तबद्ध नियोजन यामुळे कार्यक्रम अधिकच उठावदार ठरला. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांनी सुरुवातीपासूनच कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत वातावरण भारावून टाकले. युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक अशा सर्वच स्तरातील नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती.
धावत्या पीएमपी बसमध्ये महिला कंडक्टरवर जीवघेणा हल्ला; चाकू मांडीत खुपसला अन्…
आदर्श शिंदे यांनी आपल्या दमदार आणि ओजस्वी आवाजातून सामाजिक जाणीवा जागृत करणारी, अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारी भीमगीते सादर केली. “जयभीम… क्रांतीचा नारा हा, जयभीम वैऱ्या इशारा हा” या गीताने उपस्थितांमध्ये उत्साहाची लाट निर्माण केली. “बाबासाहेब जिंदाबाद” या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. विशेषतः “माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविलं रमानं” या गीताला महिलांनी कोरसच्या माध्यमातून दिलेली साथ ही कार्यक्रमाची विशेष आकर्षण ठरली. या गीतादरम्यान अनेक महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत वातावरण अधिकच भावनिक आणि प्रेरणादायी बनवले.
या कार्यक्रमाचे आयोजन आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील तसेच मल्हार पाटील यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते. त्यांच्या प्रयत्नांमुळे धाराशिवकरांना एक दर्जेदार आणि प्रेरणादायी सांस्कृतिक पर्व अनुभवता आले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात कलाकारांचा गौरव केला. भीमगीतांच्या माध्यमातून सामाजिक समतेचा, बंधुभावाचा आणि परिवर्तनाचा संदेश देणारा हा कार्यक्रम धाराशिवकरांच्या मनात दीर्घकाळ घर करून राहणार आहे.
आवाज आणि ऊर्जा: त्यांच्या आवाजातील ओज आणि गाण्यातील जोश तरुणांना आकर्षित करतो.
संगीत: उत्कर्ष-आदर्श या जोडीने अनेक नवीन, आधुनिक ढंगाची भीमगिते संगीतबद्ध केली आहेत.
आंबेडकरी वारसा: आनंद शिंदे आणि प्रल्हाद शिंदे यांच्यानंतर आदर्श शिंदे यांनी ही गायन परंपरा सक्षमपणे पुढे नेली आहे.
व्हिडिओ: त्यांच्या गाण्यांचे व्हिडिओ भव्य स्वरूपात बनवले जातात, ज्यात भीमाच्या विचारांचा आणि कार्याचा गौरव असतो.






