File Photo : Food
अहमदनगर : आधीच विद्यार्थ्यांच्या अध्यापनासाठी मिळणारा अपुरा वेळ आणि त्यातही शासनाने विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात समाविष्ट केलेल्या बारा पदार्थांचा रोजचा अहवाल ऑनलाईन पद्धतीने शासनाला देण्याच्या निर्णयाने शिक्षकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. त्यामुळे ऑनलाईन कामाचा वाढलेला ताण हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणामकारक ठरणार असल्याचे दिसून येत आहे.
पोषक व दर्जेदार आहार मिळावा, यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना अधिक व्यापक केली आहे. या अंतर्गत आठवडाभर दिल्या जाणाऱ्या खिचडीऐवजी आता बारा विविध पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या पोषणासाठी ही योजना उपयुक्त ठरत असली तरी शिक्षकांसाठी मात्र ती डोकेदुखी ठरली आहे. शिक्षकांना दररोजच्या बारा मेनूंचे पालन, खर्चाचे रेकॉर्ड आणि ऑनलाइन अहवाल भरण्यासाठी अतिरिक्त वेळ द्यावा लागत आहे. त्यामुळे अध्यापनाच्या वेळेत मोठी घट झाली आहे.
विद्यार्थ्यांना शिकवण्याऐवजी मेनूचे रेकॉर्ड आणि ऑनलाईन काम करण्यातच वेळ जातो, अशी ओरड शिक्षकांकडून केली जात आहे. खामगाव तालुक्यातील सर्व शाळांनी शासनाच्या निर्देशानुसार दररोजच्या आहाराचे वितरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
आधी स्वत: खर्च करायचं मग बिले द्यायची
खर्चाची बिले शिक्षण संचालक स्तरावर सादर करावी लागत असल्याने मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समित्यांना आधी स्वतः खर्च करावे लागत आहे. त्यातच आवश्यक साहित्य खरेदी, पोषण आहारासाठी किचकट प्रक्रिया, ऑनलाईन कामाचा बोजा आणि वेळेचे व्यवस्थापन यात शिक्षक अडकले आहेत.
शिक्षकांच्या कामावर होतोय नकारात्मक परिणाम
दरम्यान, विद्यार्थ्यांना दर्जेदार आहार मिळण्याचा उद्देश स्वागतार्ह असला, तरी शिक्षकांच्या कामावर याचा नकारात्मक परिणाम होत असल्याचे स्पष्ट होत आहे. शासनाने शिक्षकांच्या अडचणींचा विचार करून त्यांच्या कामाचा बोजा कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे.
बिलासाठी धावपळ
तणावाने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम शिक्षकांना आठवडाभर दिल्या जाणाऱ्या विविध बारा पदार्थांचा पोषण आहाराचा खर्च दररोज ऑनलाईन पध्दतीने शासनाच्या पोर्टलवर पाठविणे बंधनकारक करण्यात आले आहे. जीएसटीचे बिल मिळविण्यासाठी शिक्षकांची मोठी धावपळ होताना दिसून येत आहे. त्यामुळे वर्गात अध्यापनामध्ये चिडचिड होते तर अनेकदा पुरेसा वेळही अध्यापनाला मिळत नसल्याचे यामध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होताना दिसून येत आहे.
असा आहे आठवडाभराचा मेन्यू
भाज्यांचा पुलाव, मसालेभात, मटर पुलाव, मूग डाळ खिचडी, चना पुलाव, सोयाबीन पुलाव, मसूर पुलाव, गोड खिचडी, मटकी उसळ, तांदळाची खीर, नाचणी सत्व, मोड आलेले कडधान्य, अंडा पुलाव यांचा समावेश आहे.