चांदोली धरणातून 4500 क्यूसेकने विसर्ग सुरू; वारणा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
वारणानगर : वारणा नदीचा मुख्य जलसाठा असलेल्या वसंत सागर या चांदोली धरणातून शनिवारी (दि.५) दुपारी ४५०० क्यूसेकने वारणा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला असून, वारणा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक अभियंता बी. आर. पाटील यांनी दिली.
चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. धरणाची पाणी पातळी सांडवा पातळीच्या वरती आहे. जलाशय परिचलन सूचीप्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून शनिवारी वक्रद्वाराद्वारे २८७० क्युसेकपर्यंत विद्युतगृहाद्वारे १६३० क्यूसेक असा एकूण ४५०० क्यूसेकपर्यंत विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात आला. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार आहे, असे पाटबंधारे कोडोली उपविभागाचे सहाय्यक अभियंता बी. आर. पाटील यांनी सांगितले.
चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तसेच वारणा खोऱ्यात चालू वर्षी गतवर्षीच्या तुलनेत दीडपट पाऊस पडला असून, आजदेखील पाऊस चालू आहे. तो कमी-अधिक वाढत आहे. पावसाचा जोर असाच चालू राहिल्यास परिस्थितीनुसार विसर्ग कमी जास्त करण्यात येईल, असे सहाय्यक अभियंता बी. आर. पाटील यांनी सांगितले.
हेदेखील वाचा : Monsoon Alert: खबरदार! 9 जुलैपर्यंत नुसते धुमशान; वादळी वारे अन् IMD चा अलर्ट काय? कोकणात तर…
गेल्या वर्षी जून महिन्यात पावसाचा जोर कमी होता. आजच्या तारखेला गतवर्षी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ७७९ मिलीमीटर पाऊस पडला होता. ३४.३९ टीएमसी पाणीसाठा असलेल्या धरणात ४० टक्के पाणी साठा झाला होता. चालू वर्षी आजच्या तारखेला १२९२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, धरण ७९ टक्के भरले आहे. वारणा नदीवरील चिंचोली, माणगाव, कोडोली, तांदुळवाडी, खोची हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत.