महाविकास आघाडीत 'या' महत्त्वपूर्ण मुद्यावरून उभी फूट; काँग्रेसचा ठाकरेंच्या शिवसेनेला विरोध
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यात महायुती आणि महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून त्यांच्यातील अंतर्गत मतभेद दिसून येत आहेत. असे असताना आता विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीत नवा वाद सुरू झाला आहे. हे पद मिळविण्यासाठी शिवसेना (उबाठा) पक्षाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहिण्याचा निर्णय घेतला आहे. या पत्रावर ठाकरे गटाच्या सर्व आमदारांच्या स्वाक्षऱ्या असल्याची माहिती आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे विरोधी पक्षांमध्ये सर्वाधिक आमदार आहेत. अशा परिस्थितीत विरोधी पक्षनेतेपद त्यांना मिळावे अशी ठाकरे गटाची मागणी आहे. 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे 20 आमदार निवडून आले आहेत. याच कारणास्तव, ठाकरे गटाने विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे.
तथापि, काँग्रेसकडे फक्त 16 आमदार आहेत. असे असूनही, विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेस दावा करत आहे. त्यांचा युक्तिवाद आहे की, ठाकरे गटाचे अंबादास दानवे हे आधीच विधान परिषदेत विरोधी पक्षनेते आहेत. अशा परिस्थितीत विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला द्यावे. दोन्ही सभागृहांमध्ये एकाच पक्षाच्या विरोधी पक्षनेत्यावरून महाविकास आघाडीमध्ये वाद आहे.
महाविकास आघाडीकडे 46 आमदारांचे पाठबळ
2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत समाविष्ट असलेल्या पक्षांना फक्त 46 जागा मिळाल्या. यामध्ये काँग्रेसला 16 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला 10 जागा मिळाल्या. याशिवाय, शिवसेना (उबाठा) पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या, पक्षाने महाराष्ट्रात 20 जागा जिंकल्या. यापूर्वी आघाडी सरकार पडल्यानंतर विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे होते.
कोणत्याही पक्षाकडे नाही पुरेसे संख्याबळ
नियमांनुसार, विधानसभा किवा लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी एकूण विधानसभेच्या जागांच्या १० टक्के जागा असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र विधानसभेत एकूण २८८ जागा आहेत. यानुसार, विरोधी पक्षनेतेपदासाठी कोणत्याही पक्षाकडे किमान २९ आमदार असले पाहिजेत.
महाविकास आघाडीची एकत्रित संख्या 46
विधानसभेच्या एकूण सदस्यसंख्येच्या दहा टक्के आमदार असलेल्या पक्षाला विरोधी पक्षनेते पद देण्याची तरतूद आहे. राज्यातील 15 व्या विधानसभेत एवढे संख्याबळ विरोधी बाकांवर बसलेल्या एकाही पक्षाकडे नाही. मात्र, निवडणुकीपूर्वी झालेल्या आघाडीमुळे त्यांच्याकडे एकत्रितपणे 46 सदस्य आहेत. त्यामुळे आता विरोधी पक्षनेता मिळण्याची शक्यता आहे. त्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.