पुणे : भाजप आमदार मुक्ता टिळक (BJP MLA Mukta Tilak) यांच्या निधनामुळे कसबा पेठ विधानसभा (Kasba Peth Constituency) मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. त्यानुसार, उमेदवार ठरविला जाणार आहे. तत्पूर्वी ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांच्या महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण या जागेवर काँग्रेससह ठाकरे गटानेही दावा केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत पेच निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.
कसबा पेठ विधानसभेच्या रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाकडून कसबा विधानसभा मतदारसंघावर दावा सांगण्यात येत आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब धाबेकर यांनी या विधानसभेच्या जागेवर दावा केला असून, त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांना नाश्ता करण्यासाठी घरी बोलावत शक्तिप्रदर्शनाला सुरुवात केली आहे. याशिवाय, या बैठकीत पुणे शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी इच्छा पुण्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी फोनवरून उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली आहे.
भाजपकडून बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न
दरम्यान दुसरीकडे कसबा आणि चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी यासाठी भाजपकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. मुक्ता टिळक यांच्या कुटुंबाकडून देखील कसबा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली आहे. मात्र पक्षादेश अंतिम असेल त्यामुळे पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असल्याचं टिळक यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आलं आहे.
पोटनिवडणुकीसाठी 9 जण इच्छुक
कसबा विधानसभा पोटनिवडणूक लढवण्यासाठी महाविकास आघाडीतून एकूण 9 जण इच्छुक आहेत. त्यामध्ये काँग्रेसचे तीन, ठाकरे गटाचे पाच तर राष्ट्रवादीच्या एका इच्छुकाचा समावेश आहे. त्यामुळे आता या पोटनिवडणुकीवरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काँग्रेसकडून शक्तिप्रदर्शन
आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे कसबा विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर काँग्रेसचे नेते बाळासाहेब धाबेकर यांनी दावा केला आहे. त्यांनी याच पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेत्यांना नाश्ता करण्यासाठी घरी देखील बोलावलं.