बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्नी सुनेत्रा पवार व मातोश्री आशाबाई पवार यांच्या समवेत काटेवाडी या आपल्या गावी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रात सकाळी मतदानाचा हक्क बजावला.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या पत्नी व बारामती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासह आई आशाताई पवार यांना घेऊन मतदान केंद्रात आले. त्यावेळी प्रसिद्धी माध्यमांनी मोठी गर्दी केली होती. या तिघांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, बारामती लोकसभा मतदार संघातील सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीतील सर्व घटक पक्ष व त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चांगल्या पद्धतीने प्रचार केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना चांगला प्रतिसाद मिळालेला आहे.
प्रचाराच्या सांगता सभेत मिळालेला जनतेचा प्रतिसाद लक्षात घेता, या निवडणुकीत विजय आमचा स्पष्ट दिसत आहे. रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपाबद्दल विचारलेल्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, हे सर्व धादांत खोटे आहे, रोहित पवार यांच्या वर परिणाम झालेला आहे त्यामुळे ते बेचूट आरोप करत आहे. पुणे जिल्हा बँक मध्यरात्री उघडी होती, कोणी प्रसिद्धी माध्यमांनी पाहिले आहे का? हा व्हिडिओ नक्की रात्रीचा आहे का यापूर्वीचा आहे हे देखील महत्त्वाचे आहे.