कार्तिकी एकादशीला विठुरायाच्या महापूजेचा मान एकनाथ शिंदेंना; मंदिर समितीने दिले निमंत्रण
पंढरपूर : कार्तिकी यात्रा दरवर्षी कार्तिक शुध्द एकादशी या दिवशी भरते. यावर्षी कार्तिकी यात्रा रविवार, दिनांक 02 नोव्हेंबर रोजी आहे. या दिवशी पहाटे 2.20 वाजता उपमुख्यमंत्री व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा करण्यात येणार असून, महापूजेचे निमंत्रण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज दिनांक 14 ऑक्टोंबर रोजी मुंबई येथे मंदिर समितीकडून देण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
यावेळी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतलाताई नडगिरे, ह.भ.प ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, ॲड. माधवीताई निगडे, अतुलशास्त्री भगरे गुरूजी, ह.भ.प शिवाजीराव मोरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, विभाग प्रमुख राजेंद्र सुभेदार उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मंदिर समितीच्या वतीने सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते विणा, वारकरी पटका, श्रींची मूर्ती, उपरणे, चिपळ्या देऊन सन्मान करण्यात आला.
कार्तिकी यात्रा कालावधी दर्शन रांग, रिद्धी सिद्धी दर्शन मंडप, श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप, येथे वारकरी भाविकांसाठी देण्यात येणाऱ्या आवश्यक सोयी-सुविधांची तसेच यात्रा कालावधीत भाविकांना सुलभ व जलद दर्शन व्हावे याबाबत केलेल्या नियोजनाची माहिती तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन – संवर्धन काम व दर्शनरांगेतील प्रस्तावित स्कायवॉक व दर्शनहॉल संबंधीची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली.