"भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी", एकनाथ शिंदे यांची काँग्रेसवर सडकून टीका (फोटो सौजन्य-X)
मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा यांच्यासह सात हिंदूंना जाणुनबुजून अडकवून तब्बल १७ वर्ष त्रास देण्याचे काम काँग्रेसने केले. भगवा दहशतवादाचा रंग देऊन मतांचे राजकारण करणाऱ्या काँग्रेसने हिंदूंची जाहीर माफी मागावी, अशा शब्दांत शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली. एनआयए कोर्टाच्या निकालाने आज हिंदू धर्मीयांवरचा कलंक पुसला गेलाय. ‘गर्व से कहो हम हिंदू है’ ही घोषणा आता शंभरपट मोठ्या आवाजात देशभर दुमदुमेल, यात शंका नाही, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
एनआयए कोर्टाने मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व संशयित आरोपींची निर्दोष मुक्तता केल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी काँग्रेसच्या हिंदूविरोधी राजकारणचा बुरखा फाडला. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सतरा वर्षांच्या दीर्घ लढाईनंतर मालेगाव बॉम्बस्फोटातील सात जणांची विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. न्यायाला उशीर झाला हे खरं आहे, पण सत्य कधीही पराजित होत नसतं, हे पुन्हा एकवार सिध्द झालंय.
तसेच एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, मालेगावच्या स्फोटांप्रकरणी खोटे आरोप करुन तुरुंगात डांबण्यात आलेल्या देशभक्तांना शिवसेनेनं पहिल्यापासूनच निसंदिग्ध पाठिंबा दिला होता. कारण आपली बाजू न्यायाची आहे, याबद्दल शिवसेनेला कधीही संदेह नव्हता. कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा आदी सात जणांना या आरोपामुळे प्रचंड मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागलाय. हा अन्याय हिंदू जनता कधीही विसरणार नाही.
हिंदू कधीही देशविरोधी कृत्यं करु शकत नाही, कारण देशभक्ती हे हिंदूधर्मीयांसाठी धर्मकार्यच असतं, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. ‘हिंदू दहशतवाद’ नावाचा भंपक शब्द काँग्रेसी षडयंत्रकारी नेत्यांनी व्यवस्थेत आणला. यासारखा धादांत खोटेपणाचे त्यांच्यापाशी आता काय उत्तर आहे? अशी घणाघाती टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली. एक काळंकुट्ट पर्व आज संपलंय, असे ते म्हणाले. हिंदू सहिष्णू असतो मात्र भगवा दहशतवादाचा रंग देऊन काँग्रेसने राजकारण केले, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली.
महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे सुमारे १७ वर्षांपूर्वी २९ सप्टेंबर २००८ रोजी बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात ६ जणांचा मृत्यू झाला होता. याशिवाय १०० हून अधिक लोक जखमी झाले होते. रमजानमध्ये लोक नमाज अदा करण्यासाठी जात असताना हा स्फोट झाला होता. त्यामुळेच जखमींची संख्या जास्त होती. हल्ल्याच्या एक दिवसानंतर, ३० सप्टेंबर २००८ रोजी मालेगावच्या आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावेळी येथे ३०७, ३०२, ३२६, ३२४, ४२७, १५३-अ, १२०ब, स्फोटक कायदा आणि शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.