
Latur Municipal Election, achin Dane, Shiv Sena Latur district
शिवसेनेचे लातूर जिल्हा प्रमुख सचिन दाणे यांनी आज शनिवारी लातुरात पत्रकार परिषद घेऊन, प्रोटोकॉल ढावलून पक्षप्रवेश कसा, असा सवाल उपस्थित केला आहे. दरम्यान, शिवसेनेच्या तंबूत दाखल झालेले अपक्ष उमेदवार श्रीकांत रांजणकर यांनी मात्र, शिवसेनेचे मराठवाडा संपर्क प्रमुख पारणेकर आणि पक्षाचे युवा सेना आघाडी संपर्क प्रमुख धीरज देशमुख (मुंबई) यांच्या सांगण्यामुळे आपण मुंबईला जाऊन पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्याचे दै. नवराष्ट्रशी बोलताना सांगितले.
दरम्यान, या पक्षप्रवेशावर प्रश्नचिन्ह निर्माण करीत शिवसेनेचे लातूर जिल्हा प्रमुख सचिन दाणे यांनी लातूरमध्ये आज पत्रकार परिषद घेऊन, हा खरा पक्षप्रवेश होता, की पैशाच्या आमिषाने घडवलेला राजकीय डाव, असा प्रश्न उपस्थित केला. निवडणुकीच्या ऐन धुमाळीत शिवसेनेच्या गोटातच मोठा गोंधळ उडून संभ्रम निर्माण झाला आहे. शिवसेनेला बदनाम करण्यासाठीच हा प्रकार करण्यात आला असून, प्रलोभन दाखवून काही अपक्षांना मुंबईला नेण्यात आले, असा खळबळजनक दावा दाणे यांनी केला आहे. महापालिका निवडणुकीत आमचे केवळ १२ उमेदवार अधिकृत आहेत. त्यापैकी १० पक्षाचे आणि दोघे पुरस्कृत आहेत. उर्वरित लोकांचा शिवसेनेशी कोणताही अधिकृत संबंध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. (Shivsena politics)
सूत्रधार दोन दिवसात समोर येतील सुरेश पवार हे वैयक्तिक कामासाठी मुंबईला गेले होते, या प्रवेश कार्यक्रमाशी त्यांचा संबंध नाही, असे दाणे यांनी स्पष्ट केले. या संपूर्ण प्रकारामागील सूत्रधार दोन दिवसात समोर येतील, असा विश्वासही त्यांनी त्यांनी शेवटी व्यक्त केला. यावेळी महिला जिल्हा प्रमुख जयश्रीताई गुटेकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवसेनेत नव्याने प्रवेश केलेले अपक्ष उमेदवार श्रीकांत रांजणकर यांनी मात्र प्रतिनिधीशी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे उपरणे घालून आमचे स्वागत केल्याचे सांगितले. आपल्या समवेत शिवसेनेत प्रवेश दिलेल्या अपक्ष उमेदवारांमध्ये मनोज जोशी, निलेश मांदळे, अर्चना कांबळे, अजय गजाकोश, प्रशांत बिराजदार, शोभा सोनकांबळे, प्रशांत काळे, ओमप्रकाश नंदगावे, नरसिंह घोणे यांचा समावेश असल्याचे सागितले.
दाणे यांच्या मते मुंबईला गेलेल्यांपैकी काही मोजक्यांनाच प्रवेश देण्यात आला. तेथे अधिकृत पक्षप्रवेश छत्रपती संभाजीनगरमधील काही जणांचा होता. त्या गर्दीत लातूरचे काहीजण आतमध्ये शिरले आणि प्रवेश झाल्याचा प्रचार त्यांनी सुरू केला. पक्षाचा ठरलेला प्रोटोकॉल ढावलून असा पक्षप्रवेश होत नाही, ज्यांना निवडणुकीत ५० मतेही मिळणार नाही, अशा उमेदवारांचे नाव शिवसेनेशी जोडणे म्हणजे निव्वळ स्टंटबाजी आहे, अशी खरमरीत टीकाही त्यांनी केली. पक्षाच्या अधिकृत फेसबुक पेजवरील पोस्टवरही त्यांनी आक्षेप घेत प्रवेश केलेल्या प्रत्येक अपक्ष उमेदवाराबाबत स्वतंत्र खुलासा केला.