'कम ऑन कील मी...' मार्मिक व्यंगचित्रातून शिवसेनेने उद्धव ठाकरेंच्या विधानाचा उडवला फज्जा
मुंबई : महाराष्ट्रात शिवसेनेच्या ५९ व्या स्थापना दिनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात कटुता दिसून आली. शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या विरोधकांना खुले आव्हान दिले. उद्धव ठाकरे यांनी फिल्मी शैलीत म्हटले…’कम ऑन कील मी’ नंतर ते म्हणाले की शिवसेना मिटवण्याचे स्वप्न पाहणारे स्वतःच नष्ट झाले आहेत. गद्दारांना धडा शिकवला जाईल, दरम्यान, शिवसेनेच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनीही गर्जना केली. मृत व्यक्तीला का मारायचे. त्यांच्या नेतृत्वाखालील पक्ष हीच खरी शिवसेना आहे. महाराष्ट्रात दिवाळीच्या आसपास मुंबईच्या बीएमसीसह संपूर्ण राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची अपेक्षा आहे. बीएमसी आतापर्यंत उद्धव ठाकरेंच्या ताब्यात आहे.
याचदरम्यान, शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंनी केलेल्या ‘कम ऑन कील मी’ या वक्तव्याची सध्या सोशल मीडियावरून सध्या खिल्ली उडवली जात आहे. शिवसेनेने त्यांच्या या वक्तव्याचा समाचार मार्मिक व्यंगचित्राद्वारे घेतला आहे. काँग्रेसच्या विचारांचा श्वास घेत शरद पवारांच्या पाठबळावर उभे राहणारे उद्धव ठाकरे असे व्यंगचित्र काढून त्यांच्यावर शिवसेनेकडून टीका करण्यात आली आहे.
शिवसेनेच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेचा मेळावा वरळी येथे पार पडला. शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या मेळाव्याला शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. तर, दोन वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या उबाठा गटानेही कालच्याच दिवशी वर्धापन दिन साजरा केल्याने राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केले जात होते. या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी ‘कम ऑन कील मी’ हे वक्तव्य केलं होतं. मात्र, त्यांच्या या वक्तव्याचा सोशल मीडियावर फज्जा उडवला जात असून त्यावरच्या मीम्सचा पाऊस पडत आहे.
मात्र, शिवसेनेने सध्याच्या राजकीय स्थितीवर व्यंगचित्राच्या माध्यमातून मार्मिक भाष्य केलं आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंच्या एका हाती शरद पवारांची कुबडी दाखवून त्यांचे पाय लटपटत असल्याचे दाखवले आहे. तर, हिरव्या रंगाच्या काँग्रेसरुपी सिलेंडरने ते श्वास घेत असल्याचे दाखवण्यात आले आहे. म्हणजेच, काँग्रेसच्या विचारांचा श्वास घेऊन आणि शरद पवारांच्या पाठबळावर उभे राहणारे उद्धव ठाकरे अशी त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे. तसेच, काँग्रेसची सोबत करून शिवसेनेच्या मूळ विचारांना उद्धव ठाकरे विसरल्याचे शिवसेनेने या व्यंगचित्रातून अधोरेखित केले आहे. दरम्यान, शिवसेनेने उद्धव ठाकरेंची अवस्था दाखवणारे हे व्यंगचित्र आपल्या सोशल मीडिया पेजेसवर प्रसिद्ध केले असून त्यावर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत.