कोल्हापूरच्या हद्दवाढीला कृती समितीचा विरोध
कोल्हापूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर हद्दवाढीला संमती दिली असल्याने आता हद्दवाढीचा प्रश्न चव्हाट्यावर आला असून कृती समितीने हद्दवाढ होऊ देणार नाही असा गर्भित इशारा दिला आहे. प्रसंगी रस्त्यावरची लढाई उभी करून हद्दवाढीला विरोध केला जाईल असे ही सांगितले आहे.
कोल्हापूर महापालिकेच्या स्थापनेपासून शहराची गेली ५२ वर्षात एक इंचही हद्दवाढ झाली नाही, परिणामी कोल्हापूर शहराचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर हद्दवाढीचा चेंडू खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात गेला. मुख्यमंत्र्यांनी लोकप्रतिनिधीसह प्रशासनाला सूचना दिल्यानंतर आठ गावांचा समावेश करून हद्दवाढीची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, आता उर्वरित १२ गावांनी हद्दवाढीचा एक इंचही जागा देणार नाही अशी भूमिका घेतली आहे.
शासन हद्दवाढीसाठी दबाव टाकत असून, दोन दिवसापूर्वी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील सर्व आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत ८ गावे हद्दवाढीमध्ये घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यास परवानगी दिल्याचं आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले आहे. पण शहरालगतच्या २० गावातील ग्रामपंचायतीनी या हद्दवाढीला विरोध केला असून कोल्हापूरात हद्दवाढ विरोधी कृती समितीची बैठक पार पडली, या बैठकीमध्ये आठ गाव जरी समाविष्ट होणार असतील तरी उर्वरित १२ गावे या विरोधात ठामपणे उभी आहेत. काहीही झालं तरी आम्ही एक इंच ही जमीन हद्दवाढीसाठी देणार नाही. जर दबाव टाकून हद्दवाढ केली तर या विरोधात आम्ही रस्त्यावरची लढाई तसेच न्यायालयीन लढाई लढू असा इशाराही देण्यात आला आहे.
“एक इंच ही हद्दवाढ नसलेल्या शहरालगतच्या आठ गावांसह…”; CM फडणवीसांच्या महापालिकेला सूचना
मुंबईत झालेल्या हद्दवाढ बैठकीसाठी राज्याचे आरोग्य मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने यांच्यासह महायुतीतील लोकप्रतिनिधी उपस्थित होते. मात्र, कोल्हापूर दक्षिणचे भाजपा आमदार अमल महाडिक, करवीरचे आमदार चंद्रदीप नरके हे बैठकीला उपस्थित नव्हते. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिलेल्या आदेशानंतर या नेत्यांची भूमिका काय? असा प्रश्न उपस्थित होत असून महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकार हद्दवाढ करणार आहे का? असाही सवाल कोल्हापूरकर विचारत आहेत.
फडणवीसांच्या महापालिकेला सूचना
गेल्या अनेक वर्षापासून कोल्हापूर शहराची एक इंच ही हद्द वाढ नसलेल्या शहरा लगतच्या आठ गावांसह हद्दवाढ करा अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी महापालिकेला दिल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात हद्दवाढ होणार असे चित्र सध्या निर्माण झाले आहे.