"भाजपचे कोणी शिवसेनेत प्रवेश करणार नाहीत", शिंदे गटातील नेत्याची स्पष्ट भूमिका
कुडाळ : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे हे येत्या २४ एप्रिलला सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. कुडाळ येथील एसटी डेपो मैदानावर सायंकाळी ४ वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात शिवसेनेच्या तीनपैकी दोन जागा निवडून आल्या. त्यामुळे इथल्या जनतेचे आभार मानण्यासाठी एकनाथ शिंदे येत आहेत, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आणि उपनेते संजय आंग्रे यांनी दिली. कुडाळ येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळची उबाठा पक्षातून अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करतील पण महायुतीच्या धोरणाप्रमाणे मित्रपक्षातून कोणीही शिवसेनेत प्रवेश करणार नाहीत, असे यावेळी दोन्ही नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आले.
यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत म्हणाले की, आमचे नेते एकनाथ शिंदे हे कुडाळ येथे २४ तारखेला सायंकाळी ४ वाजता मतदारांचे जाहीर आभार मानण्यासाठी येत असून त्याची पूर्वतयारी म्हणून आज सकाळी मालवण येथे बैठक घेण्यात आली. आज कुडाळमध्ये सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची बैठक घेण्यात आली. सभेचे नियोजन करण्यात आले. एकनाथ शिंदे निवडणुकीनंतर जिल्ह्यात पहिल्यांदाच येत असल्याने कार्यकर्त्यात उत्साह आहे. महाराष्ट्रमध्ये २०२४ ला जे विधानसभा निवडणुकीत महायुती लढली त्यामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने भरभरून यश महायुतीला दिले आहे. शिंदेसाहेबांनी शिवसेनेचे उमेदवार उभे करुन त्या ठिकाणी ५७ उमेदवार निवडून आले. शिवसेनेचा स्ट्राईक रेट अतिशय चांगला होता. महाराष्ट्रामध्ये शिंदेसाहेबांच्या कामावरती संपूर्ण जनता खुश असून हा सिंधुदुर्गातील सुद्धा जनता शिंदेसाहेबांच्या केलेल्या कामावरती खुश आहे. शिंदेसाहेबांनी लाडकी बहीण योजना चालू केली.
आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दोन मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे आमदार आहेत. महायुतीमध्ये तीनपैकी दोन आमदार हे शिवसेनेचे आहेत आणि आज निलेश राणे हे निवडून आल्यानंतर आज जिल्ह्यामध्ये या कुडाळ -मालवण मतदारसंघांमध्ये या तीन-चार महिन्याच्या कालखंडामध्ये अतिशय जोमाने वाढताना दिसत आहे. त्याची प्रचिती म्हणून हा आभार मेळावा आहे. त्या मेळाव्याला सुद्धा शिवसेनेचे या जिल्ह्यातील ताकद पाहायला मिळेल. या सभेला अनेक मंत्री, आमदार आणि संपर्कप्रमुख आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत असे दत्ता सामंत म्हणाले. राज्यात सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून यापुढे ओळखला जाईल अशाप्रकारचे काम शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली होत आहे. त्यामुळे या जाहीर सभेत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उबाठा गटाचे अनेक सरपंच, कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत. मात्र, आमची महायुती असल्याने एकमेकाच्या पक्षातून कोणी प्रवेश करणार नाहीत असे सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.
संजय आंग्रे म्हणाले, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे २४ तारखेला सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. त्याचे स्वागत भव्य दिव्य करण्याचा आमच्या सर्व शिवसैनिकांचा मानस आहे. त्याच्यासाठी आपले सर्वांचे लाडके आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आणि सर्व शिवसैनिक सज्ज झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भव्यदिव्य असे त्यांचे स्वागत करायचे आहे आणि तसे नियोजन आम्ही केले आहे. एकनाथ शिंदे ज्या-ज्या ठिकाणी त्यांचे आमदार निवडून आलेत त्या ठिकाणी जाऊन ते मतदारांचे आभार मानतात त्याचप्रमाणे ते सिंधुदुर्गात येत आहेत. या सभेसाठी उद्योगमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री योगेश कदम आणि इतर माजी मंत्री तसेच आमदार दीपक केसरकर, गुलाबराव पाटील, दादा भुसे असे अनेक मंत्री या दौऱ्यात येणार आहेत. कमीत कमी १५०० च्या आसपासचे पक्षप्रवेश यावेळी होतील. पण भाजपचे असतील ते शिवसेनेत येणार नाहीत आणि शिवसेनेचे असतील तर ते भाजपात जाणार नाहीत. आम्ही १०० टक्के भाजपचे कोण पदाधिकारी किंवा कार्यकर्ते घेणार नाही, असे आंग्रे यांनी स्पष्ट केले.
पुण्यात जमिनीच्या वादातून तरुणाचा खून; प्रसार झालेल्या आरोपींना सापळा रचून पकडले