सौजन्य - सोशल मिडीया
पुणे : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता एक मोठी बातमी समोर आली आहे. जमिनीच्या वादातून तरुणाचा खून करुन पसार झालेल्या आरोपींना सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ परिसरातून आंबेगाव पोलिसांनी सापळा रचून अटक बेड्या ठोकल्या आहेत. कात्रज भगातील संतोषनगर परिसरात आरोपींनी रविवारी पहाटे तरुणाला बेदम मारहाण करुन त्याचा खून केला होता. पसार झालेल्या आरोपींना २४ तासाच्या आत पोलिसांनी पकडले.
अमर दिलीप साकोरे (वय ४०, रा. संतोषनगर, कात्रज ), मंदार मारुती किवळे (वय ३५, रा. नवीन वसाहत, कात्रज), गिरीष सुभाष बाबरे (वय २६, रा संतोषनगर, कात्रज), योगेश बाबुराव डोरे ( वय ३५, रा. खोपडेनगर कात्रज ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. शुभम सुभाष चव्हाण असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. परिमंडळ दोनच्या पोलीस उपआयुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक शरद झिने, सहायक निरीक्षक स्वाती देवधर यांनी ही कारवाई केली.
पोलिसांची चार पथके
चव्हाण याचा हॉटेल व्यवसाय होता. आरोपी व शुभम चव्हाण यांचा जमिनीवरुन वाद झाला होता. रविवारी पहाटे शुभम कात्रजमधील संतोषनगर परिसरात मित्रांसोबत गप्पा मारत थांबला होता. त्या वेळी सराइत गुन्हेगार साकोरे, किवळे, बाबरे, डोरे यांनी शुभमला बांबूने बेदम मारहाण केली होती. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या शुभमचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला, पसार झालेल्या आरोपींच्या मागावर पोलिसांची चार पथके होती. तांत्रिक विश्लेषणात आरोपी हे मोहोळ येथील कामती गावात असल्याची माहिती मिळाली. तेथील एका हाॅटेलमधून ते जेवण घेण्यासाठी थांबले होते. पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर, पोलीस कर्मचारी हणमंत मासाळ, धनाजी धोत्रे, नितीन कातुर्डे यांनी सापळा लावून आरोपींना पकडले. खून प्रकरणातील एका आरोपीचे नातेवाईक कामती गावात राहत असल्याची माहिती मिळाली.