
Dhananjay Munde Parali News, Maharashtra Politics 2026, Dhananjay Munde Speech,
परळी येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना मुंडे म्हणाले, “ज्यावेळी निवडणुकांचे वातावरण होते, त्यावेळी मी एका वेगळ्याच मनःस्थितीत होतो. संपूर्ण महाराष्ट्र एकीकडे आणि एकटा धनंजय मुंडे एकीकडे, अशी परिस्थिती निर्माण करण्यात आली होती. सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि युट्युब चॅनल्सच्या माध्यमातून माझ्याविरोधात पद्धतशीरपणे नकारात्मक वातावरण तयार केले गेले. मला संपवण्यासाठी हे सर्वजण एकत्र आले होते, तेव्हा मला जाणीव झाली की माझ्यामध्ये नक्कीच काहीतरी ‘विशेष’ आहे, म्हणूनच ही एवढी मोठी फळी माझ्या मागे लागली आहे.”
Baramati By Election : बारामती पोटनिवडणुकीत तिरंगी लढत होणार; काँग्रेसही उमेदवार देणार?
विरोधकांकडून झालेल्या आरोपांच्या भडिमारानंतरही परळीच्या जनतेने महायुतीवर विश्वास दाखवला. यावर भाष्य करताना मुंडे म्हणाले, “माझ्या विरोधात कितीही चक्रव्यूह रचले गेले तरी, परळीच्या मायबाप जनतेने त्याला भीक घातली नाही. जनतेने महायुतीला भक्कम पाठिंबा देऊन ऐतिहासिक विजय मिळवून दिला.” या विजयाबद्दल त्यांनी परळीतील मतदारांचे आभार मानत, हा विजय विरोधकांच्या अपप्रचाराला दिलेले चोख उत्तर असल्याचेही नमूद केले. (Beed Politics)
परळी येथे आयोजित ‘प्रधानमंत्री आवास घरकुल योजना’ धनादेश वाटप कार्यक्रमात बोलताना आमदार धनंजय मुंडे यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांची चांगलीच कानउघाडणी केली. घरकुल योजनेच्या लाभापासून एकही पात्र नागरिक वंचित राहता कामा नये, असे स्पष्ट निर्देश देत त्यांनी पक्षपातीपणा करणाऱ्या लोकप्रतिनिधींना कडक शब्दांत सुनावले.
कार्यक्रमात मुंडे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना घरकुलांच्या धनादेशांचे वाटप करण्यात आले. आतापर्यंत परळीत ३,००० घरकुलांचे वाटप पूर्ण झाले असून, यावर्षी १५०० घरकुलांचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. “लाभार्थ्यांच्या घरांवरील पत्रे जाऊन आता पक्के छत येणार आहे, हे आमचे स्वप्न आहे,” असेही ते म्हणाले.
परळी नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आयोजित पहिल्याच जाहीर कार्यक्रमात आमदार धनंजय मुंडे यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांचे चांगलेच कान टोचले. “निवडून आल्याचा आनंद असला तरी, जर कोणाला वाटत असेल की ते स्वतःच्या जिवावर निवडून आले आहेत, तर तो त्यांचा मोठा गैरसमज आहे,” अशा शब्दांत मुंडे यांनी लोकप्रतिनिधींना वास्तवाची जाणीव करून दिली.
धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात पराभूत आणि विजयी अशा दोन्ही उमेदवारांना सूचक इशारा दिला. ते म्हणाले की, “तुम्हाला निवडून आणण्यासाठी पडद्यामागून मी काय आणि किती प्रयत्न केले आहेत, हे अद्याप तुम्हाला ठाऊक नाही. पराभूत झालेल्यांनाही हे नीट माहित आहे की, गेल्यावेळी मी त्यांना कशा प्रकारे निवडून आणले होते.” या विधानातून त्यांनी परळीतील आपल्या राजकीय ताकदीची आणि वर्चस्वाची पुनरुक्ती केली आहे.
निवडणुकीनंतर दोन-तीन महिने उलटले असून नगरसेवक फारसे उत्साहात दिसत नसल्याचे मुंडे यांनी नमूद केले. “तुमचे निवडून येणे आणि नगरपालिकेचा निधी संपणे हे एकाच वेळी झाले आहे, त्यामुळे कदाचित तुमच्या चेहऱ्यावर आज हसू नाही. मात्र, ही परिस्थिती कायम राहणार नाही. लवकरच निधी उपलब्ध करून ही परिस्थिती बदलली जाईल,” असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. राजकारणात केवळ निवडून येणे महत्त्वाचे नसून जनतेची कामे करण्यासाठी प्रशासकीय पाठपुरावा आणि निधीची उपलब्धता आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.