यवत : दौंड तालुक्यातील पारगाव (Pargaon) येथे राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी अतिशुद्ध मद्यार्काची तस्करी उघडकीस आणली असून, या कारवाईत ५३ लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पारगाव हद्दीत चौफुला-शिरूर रोडवर रात्री ही कारवाई करण्यात आली.
सुरिंदरसिंग मेला सिंग (वय ४७, अमृतसर, पंजाब) असे या आरोपीचे नाव आहे. हा आरोपी टँकरमधून अतिशुध्द मद्यार्काची तस्करी करताना राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक दोनने रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून सोळाचाकी टॅंकरसह ५३ लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आरोपी सिंग याला अटक करण्यात आली.
या पथकाची कारवाई
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उप-आयुक्त अनिल चासकर, अधीक्षक सी. बी. राजपूत, उपअधीक्षक संजय पाटील, युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक तानाजी शिंदे, निरीक्षक आर. टी. पोटे, दुय्यम निरीक्षक बाळासाहेब नेवसे, योगेंद्र लोळे, जवान एस. बी मांडेकर, के. आर. पावडे, जी. बी. वाव्हळे, एन. जे. पडवळ, एस. पी. धुर्वे, टी. एस. शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक बाळासाहेब नेवसे करीत आहेत.