पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांची पक्षामधून हकालपट्टी करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रविकांत तुपकर हे पक्षविरोधी काम करत असल्याचा ठपका ठेवत शिस्तभंग समितीने हा मोठा निर्णय घेतला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील तसेच पक्षाचे सदस्य आणि पदाधिकाऱ्यांची पुण्यामध्ये बैठक झाली. यांनतर पत्रकार परिषदेमध्ये निर्णय जाहीर करण्यात आला.
शिस्तपालन समितीने काय म्हटलं?
“लोकसभेत राजू शेट्टी यांचा पराभव झाल्यानंतर आम्ही काम करत आहोत. संघटनेचे नेते रविकांत तुपकर घेत असलेल्या बैठकीविषयी आम्हाला माहिती नाही. त्यांना संघटेने पद दिले. एकदा पक्ष सोडला त्यानंतर परत आले, काम करत राहिले. अलिकडे झालेल्या ऊस परिषदेला ते उपस्थितीत राहिले नाहीत, ते आमच्या नेतृत्वावर टीका करत आहेत, असे जालिंदर पाटील म्हणाले.
“शिस्तभंग समिती नेमली, त्यांना पत्र दिलं ते आले नाहीत. ते पक्ष राज्य कार्यकारणीला पण उपस्थितीत राहिले नाहीत. रविकांत तुपकर मीडियातून बोलत राहिले. आता लोकसभेमध्ये सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे काम केले. राजू शेट्टी यांच्या विरोधात तुपकर बोलत राहिले, तुपकर यांच्यामुळे चळवळीच नुकसान होत आहे,” असे या शिस्तपालन समितीने स्पष्ट केले आहे.
जालिंदर पाटील म्हणाले की, तुपकर यांना अनेकदा संधी देऊनही ते आमच्या शिस्तपालन समितीसमोर हजर झालेले नाही. उलट ते शेट्टी यांच्यावर सातत्याने टीका करताना दिसतात. गेल्या तीन ऊस परिषदेलाही ते गैरहजर राहिले आहेत. रविकांत तुपकर आणि राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आजपासून कोणताही संबंध राहिलेला नाही. असं आम्ही शिस्त पालन समितीच्या वतीने जाहिर करतो. तुपकर यांनी शेतकरी संघटनेत खूप काम केलेलं असल्याने आम्ही त्यांच्याबाबत हकालपट्टी हा शब्द प्रयोग करणार नाही, असं पत्रकार परिषदेत जालिंदर पाटील यांनी सांगितलं.