सौजन्य फोटो - सोशल मडिया
मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला
मुंबईत माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र, त्या पद्धतीने मत मांडत असताना एखाद्यावर हल्ला करणे योग्य नाही. पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले असून, एकमेकांच्या भावना समजून घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यासारख्या शहरात अशा प्रकारचे वाद होणे योग्य नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. गणेशोत्सव अधिक पारंपरिक पद्धतीकडे नेण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजेत. पहिल्याच वर्षी हे शंभर टक्के शक्य होणार नाही; मात्र त्यादिशेने सातत्याने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
डीजेच्या आवाजाविरोधात बापटांची भूमिका
विद्यानंद बापट हे नारायण पेठ परिसरातील रहिवासी असून, पर्यावरण आणि ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्यांवर भूमिका मांडत आहेत. पुण्यातील गणेशोत्सवातील मिरवणुकांमध्ये डीजे आणि ढोल पथकांमुळे होणाऱ्या मोठ्या आवाजाला त्यांनी यापूर्वी विरोध केला होता. बापट यांनी पुणे महानगरपालिकेच्या सभेतही डीजेच्या वापराला विरोध केला होता. त्यावेळी काही गणेश मंडळांचे प्रतिनिधी तसेच राजकीय व्यक्तींनी त्यांच्या भूमिकेला विरोध केला होता. त्या वेळी पालिकेच्या सुरक्षारक्षकांच्या बंदोबस्तात त्यांना सभागृहाबाहेर नेण्यात आल्याचेही सांगण्यात आले होते.
माध्यमांशी बोलताना हल्ला
गुरुवारी टिळक रस्त्यावर बापट हे माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली. या घटनेनंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी संतोष चव्हाण याला ताब्यात घेतले असून, हल्ल्याचे नेमके कारण आणि या घटनेमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.
हेही वाचा: पुण्यात डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण; टिळक रस्त्यावर हल्ला
‘सवंग प्रसिद्धीसाठी हल्ला’ असा बापटांचा आरोप
हल्ल्यानंतर विद्यानंद बापट यांनी प्रतिक्रिया देताना आपण असुरक्षित स्थितीत असताना हल्ला करण्यात आल्याचा आरोप केला. हा प्रकार सवंग प्रसिद्धीसाठी करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले. घटनेचे व्हिडीओ फुटेज उपलब्ध असल्याचा दावा करत पोलिसांनी ते तपासून कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. सार्वजनिक उत्सव साजरे करण्यास आपला विरोध नसून, उत्सवाच्या काळात ध्वनीप्रदूषण होऊ नये आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, एवढीच आपली भूमिका असल्याचे बापट यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या मारहाणीच्या घटनेमुळे डीजे, ध्वनीप्रदूषण आणि गणेशोत्सवाच्या पारंपरिक स्वरूपाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.






