काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप! मुलीने मुख्यमंत्री रेवंत रेड्डींविरोधात केलं वक्तव्य; आई कोंडा सुरेखांच्या मंत्रिपदावर गंडांतर
कोंडा सुरेखा यांच्या मुलीने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्याविरोधात वक्तव्य केल्यानंतर तेलंगणा काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र झाल्याची चर्चा आहे. त्यानंतर आता थेट कोंडा सुरेखा यांच्या मंत्रिपदावरच गंडांतर आल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी कोंडा सुरेखा यांना मंत्रिपरिषदेतून हटवण्याची शिफारस राज्यपालांकडे पाठवली आहे. त्यामुळे या शिफारशीवर राज्यपालांकडून पुढील कार्यवाही झाल्यानंतर त्यांच्या मंत्रिपदाबाबत अधिकृत स्थिती स्पष्ट होणार आहे.
या संपूर्ण वादाची सुरुवात कोंडा सुरेखा यांच्या कन्या कोंडा सुष्मिता पटेल यांच्या वक्तव्यामुळे झाली. सुष्मिता यांनी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि काँग्रेसमधील काही नेत्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते. विशेषतः परकल विधानसभा मतदारसंघाबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेवर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
नुकताच परकल येथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी विद्यमान आमदार रेवुरी प्रकाश रेड्डी यांना उघडपणे पाठिंबा दिला. एवढेच नव्हे तर आगामी निवडणुकीत प्रकाश रेड्डी यांना पुन्हा विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी मतदारांना केले.
मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेनंतर सुष्मिता पटेल यांनी नाराजी व्यक्त केली. परकल हा कोंडा कुटुंबाचा प्रभाव असलेला भाग असल्याचा दावा करत त्यांनी, मुख्यमंत्री या मतदारसंघात विद्यमान आमदाराच्या समर्थनासाठी का उतरले? असा सवाल उपस्थित केला.
सुष्मिता यांच्या वक्तव्यानंतर तेलंगणा काँग्रेसमधील राजकीय वातावरण तापले. पक्षातील अनेक आमदारांनी मंत्री कोंडा सुरेखा यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली. त्यानंतर काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने सुरेखा यांच्याकडून या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण मागितले.
कोंडा सुरेखा यांनी मात्र शिस्तपालन समितीच्या नोटिशीवर आक्षेप घेतला. आपल्या मुलीने स्वतःचे राजकीय मत व्यक्त केले असून, तिच्या वक्तव्यासाठी आपल्याला जबाबदार धरता येणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली.
केवळ कौटुंबिक नात्याच्या आधारावर एका व्यक्तीच्या विचारांची राजकीय जबाबदारी दुसऱ्या व्यक्तीवर निश्चित करणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सुष्मिता या स्वतंत्र व्यक्ती असून त्यांच्या राजकीय विचारांची जबाबदारीही त्यांचीच आहे, असे सुरेखा यांनी म्हटले.
सुरेखा यांना त्यांच्या मुलीच्या वक्तव्याचे समर्थन आहे का, असाही प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावरही मुलीचे विचार आणि स्वतःची राजकीय भूमिका यांची सांगड घालणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वाद वाढल्यानंतर कोंडा सुरेखा यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि तेलंगणा काँग्रेसच्या प्रभारी मीनाक्षी नटराजन यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर सुरेखा यांनी मंत्री म्हणून केलेल्या कामाचा बचाव केला. मात्र त्यानंतरही पक्षातील वाद शांत झाला नाही.
आता मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्याकडून त्यांना मंत्रिमंडळातून हटवण्याची शिफारस करण्यात आल्याने हा संघर्ष आणखी गंभीर झाला आहे. राज्यपालांकडून औपचारिक कार्यवाही झाल्यानंतर या निर्णयाला अंतिम स्वरूप मिळू शकते.
दरम्यान, तेलंगणा सरकारने काही महत्त्वाच्या बोर्ड आणि आयोगांमध्येही बदल केले आहेत. तेलंगणा नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष जी. चिन्ना रेड्डी यांची नियुक्ती तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात आली असून त्यांच्या जागी गडवाल विजयलक्ष्मी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तेलंगणा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी नेरेल्ला शारदा यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय माजी राज्यसभा सदस्य सुधा राणी यांना काकतीय अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या (KUDA) अध्यक्षपदी नियुक्त करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे.
Environment Report : पर्यावरणाच्या बाबतीत भारताची स्थिती चिंताजनक; १७७ देशांत १७६वा क्रमांक






