Chandrashekhar Bawankule
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यात मुख्यमंत्रिपदावरून महायुतीत पुन्हा एकदा चर्चा सुरु झाल्या आहेत. 2034 पर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदावर कायम राहतील, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. त्यावरून आता राजकीय वादंग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, 2034 पर्यंत फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील. विकसित महाराष्ट्र हा फडणवीस यांचा संकल्प आहे. फडणवीस मुख्यमंत्री असल्याशिवाय विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण होऊ शकत नाही. फडणवीस यांच्या नेतृत्वातच आपल्याला पुढे जायचे आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे डबल इंजिन सरकारच राज्याचा विकास, भले करू शकतात, असे बावनकुळे म्हणाले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माध्यमांनी याविषयी विचारले असता, त्यांनी हात जोडत नमस्कार केला आणि शुभेच्छा, अशा एका शब्दांत प्रतिक्रिया दिली. तर शिवसेना नेते रामदास कदम यांनी २०३४ कशाला ते २०८० पर्यंत मुख्यमंत्री राहू द्या, असा चिमटा त्यांनी काढला. पण त्याचवेळी आमच्यात कोणी भांडणं लावण्याचा प्रयत्न करत असेल तर तो यशस्वी होणार नाही, असे ते म्हणाले.
2080 पर्यंत फडणवीस यांना मुख्यमंत्री राहूद्या
यावर 2034 कशाला? 2080 पर्यंत फडणवीस यांना मुख्यमंत्री राहूद्या, असा टोला शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी लागवला. या जुगलबंदीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हात जोडत ‘शुभेच्छा’ अशी एका शब्दांत प्रतिक्रिया दिली.
मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वात सरकारचे काम
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक नोव्हेंबर महिन्यात पार पडली. या निवडणुकीचा निकालही जाहीर झाला आहे. यामध्ये भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला चांगले यश मिळाले असून, बहुमताचा आकडाही पार केला आहे. त्यानंतर भाजप नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात राज्य सरकार आपला कारभार चालवत आहे.