
एका अक्षराच्या चुकीमुळे 'या' गावातील शेतकरी दिवाळी मदतीपासून वंचित; प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड
उमरखेड तालुक्यात खरुस बुद्रुक आणि खरुस खुर्द अशी दोन स्वतंत्र गावे आहेत. मात्र, पीकपेरा नोंदणीच्या ऑनलाइन प्रणालीत ‘खरुस बु.’ ऐवजी ‘खरुस खु.’ असा चुकीचा उल्लेख आहे. त्यामुळे गावाचा नकाशा आणि शेतकऱ्यांची नावे ऑनलाइन दिसत नसल्याने पीकपेरा नोंदणी रखडली आहे. २१ ऑगस्ट २०२६ रोजी तहसीलदार आणि महसूल अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊनही दीड महिन्यापासून दुरुस्ती करण्यात आलेली नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीपूर्वी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपये जमा करण्याची घोषणा केली होती. तालुक्यातील इतर गावांतील शेतकऱ्यांना मदत मिळाली; मात्र खरुस बुद्रुकमधील एकाही शेतकऱ्याच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही. प्रशासनाच्या एका चुकीची शिक्षा गोरगरीब आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांनी का भोगायची, असा संतप्त सवाल ग्रामस्थ करीत आहेत. तालुक्याचे राजकीय दैवत मानले जाणारे नारायणराव पाटील वानखेडे यांचे हे गाव आहे. मतखंड परिसरातील प्रमुख गावातील शेतकऱ्यांची अशी प्रशासकीय हेळसांड होत असेल, तर सामान्य जनतेच्या समस्यांकडे प्रशासन किती गांभीर्याने पाहत असेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने त्रुटी दूर करून शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे.
दोन वेगवेगळ्या गावांची गल्लत होणे ही साधी चूक नाही, हा शेतकऱ्यांच्या हक्कावर गदा आणणारा प्रकार आहे. प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन तातडीने मदत मिळवून द्यावी. – अवधूत वानखेडे, शेतकरी
संतप्त शेतकऱ्यांचा प्रशासनाविरोधात एल्गार
प्रगतीशील शेतकरी बालाजीराव वानखेडे यांच्यासह गावातील सर्व शेतकऱ्यांनी या भोंगळ कारभाराचा तीव्र निषेध केला आहे. ही चूक नेमकी कोणाच्या स्तरावर झाली याची चौकशी करून खरुस बुद्रुकची स्वतंत्र ऑनलाइन नोंद करावी आणि वंचित राहिलेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्य खात्यात तात्काळ पाच हजार रुपये जमा करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.
गावाचे नाव खरुस बुद्रूक असताना ऑनलाइन खरुस खुर्द दाखवले जात आहे. दीड महिन्यापूर्वी सांगूनही दुरुस्ती झाली नाही. एका अक्षराच्या चुकीमुळे आमच्या गावातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, ही अत्यंत गंभीर बाब आहे. – बालाजी वानखेडे (माजी सरपंच, खरुस बु.)
मी अल्पभूधारक शेतकरी आहे. दिवाळी मदतीची आम्हाला नितांत गरज होती. पण प्रशासनाच्या चुकीमुळे आम्ही लाभापासून वंचित राहिलो आहोत. ही चूक तत्काळ दुरुस्त करावी. – रामा पावडे (अल्पभूधारक शेतकरी, खरूस बु.)
Ans: महसूल प्रशासनाच्या ऑनलाइन प्रणालीमध्ये 'खरुस बु.' ऐवजी 'खरुस खु.' अशी चुकीची नोंद झाल्यामुळे पीकपेरा नोंदणी रखडली आणि शेतकऱ्यांना दिवाळी मदत मिळाली नाही.
Ans: पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी ५ हजार रुपये जमा करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, ऑनलाइन नोंदीतील चुकीमुळे खरुस बुद्रुकमधील शेतकरी या लाभापासून वंचित राहिले.
Ans: ऑनलाइन प्रणालीतील गावाच्या नावाची चूक तातडीने दुरुस्त करून स्वतंत्र नोंद करावी आणि वंचित शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी ५ हजार रुपये जमा करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.