
ऊस दरासाठी शेतकरी संघटना आक्रमक, वाहनांवर दगडफेक; अनेक पोलीस जखमी
या आंदोलनादरम्यान महामार्गावर वाहनांवर दगडफेक केल्याचा प्रकार घडला. दरम्यान जिल्हा पोलीस प्रमुख आणि हसीरु शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष चुनापा पुजारी यांच्या आवाहनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यानंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू झाली. हतरगी टोल नाका येथे पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. सायंकाळी ५ वाजता तुफान दगडफेक सुरू झाली त्यात अनेक वाहनांचे नुकसान झाले. पोलीस जखमी झाले. पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरू करताच संतापलेल्या आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग रोखत दगड फेक सुरूच ठेवली. आंदोलक व पोलीस यांच्या झटापटीनंतर चर्चेतून मार्ग काढण्यात आला. पाच तास राष्ट्रीय महामार्ग रोखल्याने वाहनांची गर्दी झाली होती.
कर्नाटक राज्य सरकारच्या मध्यस्थीनंतर अखेर ऊस दराचा तिढा सुटला. शुक्रवारी शेतकरी नेते आणि साखर कारखानदारांसोबत झालेल्या स्वतंत्र बैठकीत तडजोडीने ऊस दरावर तोडगा काढण्यात आला. तोडणी आणि वाहतूक खर्च वगळून प्रतिटन उसाला ३,३०० रुपये दर देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. मुडलगी तालुक्यातील गुर्लापूरसह विविध ठिकाणी सुरू असलेले आंदोलन संपुष्टात आले. प्रतिटन ३,५०० रुपये दर मागणी करत बेळगाव, विजापूर, बागलकोट जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले होते.