बारामती : शारदानगर (ता. बारामती) येथील शारदाबाई पवार महिला महाविद्यालयाच्या दीड हजार विद्यार्थिनींच्या उत्स्फूर्त सहभागामध्ये तसेच परिसरातील महिलांच्या उपस्थितीमध्ये महाभोंडला मोठ्या उत्साहात पार पडला. या महाभोंडल्याचा आनंद नेदरलँड येथील परदेशी पाहुण्यांनी घेतला.
जागर स्त्रीशक्तीचा, शारदानगर येथे शारदा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या भव्य मैदानावर अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या शारदा कला व क्रीडा मंच तर्फे महाभोंडल्याच्या दिमाखदार सोहळयाचे आयोजन करण्यात आले. बारामती पंचक्रोशीतील महिलांना यासाठी आमंत्रित केले होते. स्त्रियांच्या अभिव्यक्तीला व्यासपीठ देण्यासाठी स्त्री हुंकाराची जाणीव-जागृती होण्यासाठी तसेच आजच्या आधुनिक तरूणाईला आपली पंरपरा व संस्कृती यांची ओळख व्हावी व ती वृध्दिंगत व्हावी या हेतूने ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार याच्या प्रेरणेने या महाभोंडल्याचे आयोजन केले.
कोविड मधील नियोजनातील खंडानंतर पुन्हा प्रचंड मोठ्या संख्येने शारदानगर शैक्षणिक संकुलात बारामती पंचक्रोशीतील महिलांनी यामध्ये उत्साहाने भाग घेतला. मुलींच्या पथकाने ढोल ताशांच्या गजरात पाहुण्यांना दुर्गा पूजेसाठी आंमत्रित केले. परंपरेनुसार बळीराजावर सदैव कृपादृष्टी करणाऱ्या व संपूर्ण जीवसृष्टीला सुख प्रदान करणाऱ्या हस्त नक्षत्राचे प्रतीक म्हणून हत्तीच्या भव्य मूर्तीची प्रतिकात्मक पूजा संगीता काकडे, सुनिता शहा, मंगला बोरावके तसेच अक्कमहादेवी मंडळ, जैन श्राविका मंडळ, तनिष्का महिला व्यासपीठ, सावित्रीबाई फुले महिला मंडळ, जिजाऊ सेवा संघ, यशश्री फाऊंडेशन, लायनेस ग्रुप, बचतगट आदी महिलांच्या हस्ते करण्यात आली.
[read_also content=”माळेगाव साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ; विविध विषयाला मंजुरी https://www.navarashtra.com/maharashtra/confusion-at-malegaon-sugar-factorys-annual-general-meeting-approval-of-various-subjects-nrdm-331762.html”]
या वर्षीचे विशेष म्हणजे स्टडी टूर साठी आलेल्या व्ही. एच. एल विद्यापीठ, नेदरलँड्स च्या परदेशी पाहुण्यांनी देखील उपस्थित राहून भारतीय परंपरा व महाभोंडला संस्कृतीचा आंनद घेतला. शारदानगर शैक्षणिक संकुलातील एकात्मतेचे प्रदर्शन करीत सफाई कर्मचाऱ्यांनी पारंपारिक गरबा नृत्य अतिशय लयबद्ध पद्धतीने प्रस्तुत करून प्रेक्षकांची मने जिंकली. या महाभोंडल्याचे मुख्य आकर्षण म्हणजे ४०० मीटर ट्रॅकच्या मैदानावर १५०० विद्यार्थिनींनी दांडिया समूह नृत्य करून आनंदाने वातावरण भारावून टाकत सारे वातावरण जल्लोषित केले. यानंतर महाभोंडल्याचा फेर सर्वांनी धरला. पारंपारिक गाण्यांच्या तालावर भोंडला करण्यात आला.
खिरापतीचे वाटपही झाले. फुगड्या, उखाणे यांसारख्या पारंपारिक खेळाचाही आनंद घेतला. माध्यमिक व नर्सिंग विभागाचे नृत्य कौतुकास्पद होते. उपस्थित सर्व महिलांच्या आनंदित मुद्रा महाभोंडल्याचा यशस्वीतेची साक्ष देत होत्या.