
Former MP Sanjay Patil supports villagers hunger strike against tree felling in Sangli
Tree felling in Sangli : तासगाव : राज्यामध्ये प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या वृक्षतोडीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नाशिकमध्ये देखील सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये तपोवनासाठी झाडांची कत्तल केली जात आहे. याविरोधात मोठ्या प्रमाणात जन आंदोलन उभारण्यात आले. याचबरोबर तासगावमध्ये देखील ग्रामस्थ वृक्षतोडी विरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत. ग्रामस्थांनी यासाठी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर त्यांच्या या आमरण उपोषणाला माजी खासदार संजय पाटलांचा पाठींबा मिळाला आहे.
बलगवडे (ता. तासगाव) येथील गायरान क्षेत्रातील गट क्रमांक १८० व १८१ मध्ये प्रस्तावित प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड केली जात आहे. या भागामध्ये प्रस्तावित असलेल्या सौर प्रकल्प आणि सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणातील वृक्षतोडीविरोधात ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरु केले. आक्रमक ग्रामस्थांच्या या आमरण उपोषणाला आज माजी खासदार संजय पाटील यांनी भेट दिली. यावेळी माजी खासदार संजय पाटील यांनी ग्रामस्थांच्या समस्या आणि मतं जाणून घेत त्यांच्या आंदोलनाला ठाम पाठिंबा जाहीर केला.
हे देखील वाचा : Sangli News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार सांगली दौऱ्यावर; अहिल्यादेवी होळकर पुतळ्याचे करणार लोकार्पण
माजी खासदार संजय पाटील यांनी आंदोलन स्थळी जात उपोषणकर्त्यांशी संवाद साधला.यावेळी संजय पाटील म्हणाले की, “पर्यावरण, गायरान जमीन आणि गावाच्या हितासाठी ग्रामस्थांची भूमिका पूर्णपणे न्याय्य आहे. या संघर्षात मी ठामपणे त्यांच्या पाठीशी उभा आहे. त्यांच्या या पाठिंब्यामुळे उपोषणकर्त्यांना नवी ऊर्जा मिळाली असून प्रशासनावर दबाव अधिक वाढल्याचे दिसून आले.
गायरान क्षेत्रातील दोन्ही गटांमध्ये सौर प्रकल्पाच्या नावाखाली हजारो वृक्षांची तोड सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या तोडीमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान तर झालेच, पण जनावरांच्या चाऱ्याची कमतरता, तरुणांच्या खेळाच्या मैदानाची हानी आणि ग्रामपंचायतीने लावलेल्या झाडांचा नाश या अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत. प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांनी संतप्त होत ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण सुरू केले.
हे देखील वाचा : गिरीश महाजनांना मस्ती आलीये..; सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी घेतला खरपूस समाचार
यावेळी उपोषणकर्ते जोतीराम जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना झाडांच्या संख्येबाबत चुकीची माहिती देऊन प्रशासन दिशाभूल करत असल्याचा आरोप केला. प्रकल्प रद्द होईपर्यंत आंदोलन न थांबवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. माजी खासदार संजय पाटील यांच्या भेटीनंतर ग्रामस्थांनी प्रशासनाने तातडीने प्रकरणाचा गंभीरतेने आढावा घेऊन योग्य निर्णय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.