अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अहमदनगरच्या पाथर्डी (Pathardi) तालुक्यातील बाभूळगावमध्ये (Babhulgaon) एकाच विहरीत चार मृतदेह आढळले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले आहेत. रात्रीच्या वेळेस यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. यामुळे एका रात्रीत असं काय घडल? सामूहिक हत्या आहे की आत्महत्या याचा तपास पोलिस करत आहेत.
नेमकं काय घडलं?
दिपक गोळक यांचा माळीबाभुळगाव हद्दीत फ्लाईंगबर्ड शाळेच्या पाठीमागे पोल्ट्रीफार्मचा उद्योग आहे. तेथे पाच कुटुंब आणि इतर पाचजण राहतात. त्यातील एक कुटंब धम्मपाल सांगडे आणि त्याची पत्नी कांचन सांगडे, मुलगा निखील सागडे, मुलगी निषीधा आणि संचिता असे राहत होते. धम्मपाल सांगडे आणि त्याची पत्नी कांचन यांच्यात बुधवारी रात्री वाद झाला. यावेळी इतरांनी मध्यस्ती करुन वाद मिटवला.
झोपल्यानंतर पुन्हा नवरा बायकोत वाद झाल्याचे समजले. त्यानंतर सकाळी पोल्टीफार्मवर काम करणारा एकजण विहरीवर मोटार सुरु करायला गेला होता. तेव्हा निषीधा धम्मपाल सांगडे (वय-दीडवर्षे) हिचा मृतदेह विहरीच्या पाण्यावर तरंगताना दिसला. पोल्ट्रीपार्मचे चालक दिपक गोळक यांना माहीती मिळताच त्यांनी पोलिसात खबर दिली.
यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. विहिरीमध्ये 30 ते 35 फुट पाणी होते. विजपंपाच्या सहाय्याने पाणी उपसण्यात आलं. तीन ते चार तास पाणी उपसल्यानंतर कांचन धम्मपाल सांगडे ( वय 26 वर्षे) , निखील धम्मपाल सांगडे( वय-6 वर्षे) , संचिता धम्मपाल सांगडे( वय- 4 वर्षे) असे तिघांचे मृतदेह सापडले.
कांचनचा नवरा पोलिसांच्या ताब्यात
कांचन आणि तिची तीनही मुलं विहरीत मृत अवस्थेत सापडले. पोलिसांनी कांचनचा नवरा धम्मपाल सांगडे याला ताब्यात घेतले आहे. चौघांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. पोलीस घटनेचा तपास करीत आहेत.
धम्मपाल सांगडे (वय-30 वर्षे) हा करोडी, ता. हादगाव, जि. नांदेड येथील मुळ रहिवासी आहे. तो बायको कांचन आणि एक मुलगा, दोन मुलींना घेऊन दिपक गोळक यांच्या पोल्ट्रीफार्मवर मजुरीचे काम करत होता. धम्मपाल हा व्यसनी असल्याचे पोलीस तपासात समजले आहे. पोलिसांनी धम्मपालला ताब्यात घेतले आहे.