चाकण: चाकण जवळच्या कडाची वाडी (ता. खेड) येथील पी. के. टेक्निकल कॉलेज जवळ असणाऱ्या पाझर तलावात पोहायला गेलेल्या चार शाळकरी मुलांचा दमछाक झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी (दि. ३१) दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी या चिमुरड्यांचे मृतदेह बाहेर काढले. यावेळी उपस्थितांच्या हृदयाचा ठोका चुकला.
ओमकार बाबासाहेब हंगे (वय 13 वर्षे, राहणार मार्तंड नगर मेदनकरवाडी, मूळ राहणार हंगेवाडी, तालुका केज, जिल्हा बीड), श्लोक जगदीश मानकर (वय 13 वर्षे, राहणार मेदनकरवाडी, ता. खेड, मूळ राहणार धनवडी, तालुका वरुड, जिल्हा अमरावती), प्रसाद शंकर देशमुख (वय 13 वर्षे राहणार मेदनकरवाडी ता. खेड मूळ राहणार अंबुलगा, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड), नैतिक गोपाल मोरे (वय 13 वर्षे, रां. मेदनकरवाडी ता. खेड, मूळ राहणार बुलढाणा झरी बाजार, तालुका अकोट, जिल्हा अकोला.) अशी बुडून मृत्युमुखी पडलेल्या मुलांची नावे आहेत.
या बाबतची सविस्तर माहिती अशी की, हे चौघेही सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आपापल्या घरातून या पाझर तलावात पोहण्यासाठी गेले होते. दुपार पर्यंत मुले घरी न आल्याने मुलांच्या पालकांनी आजूबाजूला शोध घेतला असता पाझर तलावाच्या काठावर सदर मुलांच्या चपला आणि कपडे पडल्याचे आढळून आल्याने मुलं पाण्यात बुडाली की काय याचा शोध घेण्यास त्यांनी सुरुवात केली. काही वेळातच या चारही मुलांचे मृतदेह सापडले. आपल्या चिमुकल्यांचा मृतदेह पाहताच पालकांनी एकच हंबरडा फोडला.
उदरनिर्वाहसाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी या मुलांचे आई वडील राज्याच्या इतर जिल्ह्यांतून चाकण या ठिकाणी आले होते. भाड्याने खोल्या घेऊन राहणाऱ्या चारही कुटुंबातील मुलांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मेदनकरवाडीचे माजी सरपंच महेंद्र मेदनकर, अमित मेदनकर आदींनी चाकण ग्रामीण रुग्णालयात भेटी देऊन नातेवाईकांचे सांत्वन केले. रात्री उशिरा शवविच्छेदन झाल्यानंतर मुलांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू
सायनी येथील पिल्लई महाविद्यालयात थर्ड इअरमध्ये शिकणारा अनिकेत किसन भगत (वय 20) याचा मोरबे धरणात बुडून मृत्यू झाला. अनिकेत भगत हा सुकापूर, पनवेल येथील विद्यार्थी असून, परीक्षा संपल्यावर आणि सुट्टी असल्याने मित्रांसोबत नवी मुंबई महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाच्या परिसरात आला.
मोरबे धरणात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू; दमछाक झाली अन्…
सर्व मित्र पाण्याबाहेर असताना पोहोण्यासाठी तो पाण्यात उतरला. काही अंतर गेल्यावर त्याची दमछाक झाली आणि बुडून त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मित्रांनी ही माहिती स्थानिकांना दिल्यावर खालापूर पोलिस निरीक्षक सचिन पवार हे पोलिस उपनिरीक्षक विशाल पवार यांच्यासह दाखल झाले. अपघातग्रस्तांना तत्काळ मदत करणारी सामाजिक संस्था प्रमुख गुरुनाथ साठेलकर आपल्या टीमसह दाखल झाले. दीड तास पोहून आणि बोटीने पाण्यात तपास केल्यावर सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास मृतदेह सापडला.