राज्यसभा निवडणुकीतील सहाव्या जागेवर शिवसेनेकडून संजय पवार आणि भाजपकडून धनंजय महाडिक हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ही जागा जिंकण्यासाठी महाविकास आघाडी किंवा भाजप यांच्यापैकी कोणाकडेही पुरेसे संख्याबळ नाही. त्यामुळे अपक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. मात्र, महाविकास आघाडीचे अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि नवाब मलिक (Nawab Malik) हे दोन्ही मंत्री सध्या तुरुंगात असल्याने ही दोन मते कमी होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास महाविकास आघाडीची अडचण वाढू शकते. या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख आणि नवाब मलिका यांना राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाला परवानगी मिळावे, यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत.
अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्याकडून आज (सोमवार) राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाला परवानगी मिळावी, यासाठी न्यायालयात अर्ज करण्यात आला. या अर्जावर सुनावणीवेळी न्यायालयाने ईडीचा अभिप्राय मागितला. तेव्हा ईडीने अभिप्राय देण्यासाठी वेळ मागून घेतली. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ जून रोजी होणार आहे. त्यावेळी ईडी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाला जाण्यासाठी परवानगी देणार का, हे पाहावे लागेल. त्यामुळे अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या मतदानाच्या अधिकाराचे भवितव्य आता ईडीच्या भूमिकेवर अवलंबून आहे.
१० जून रोजी राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. यापैकी पाच जागांवर संबंधित पक्षांचे उमेदवार सहजपणे निवडून येतील. मात्र, सहाव्या जागेसाठी प्रचंड चुरस आहे. या निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून शिवसेना आणि काँग्रेसने आपल्या आमदारांना मुंबईत दाखल होण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, भाजपकडून कोणत्याही आमदाराला फूस लावली जाऊ नये म्हणून महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना हॉटेलमध्ये एकत्रच ठेवले जाणार आहे.