पाचोड : चोरट्यांनी उभ्या असलेल्या तीन ट्रकातून हजारो लिटर डिझेल काढून लंपास केल्याची घटना पाचोड (ता.पैठण) येथील मोसंबी मार्केटमध्ये रविवारी सकाळी उघडकीस आली. यामुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान, वाढत्या डिझेल चोरी होण्याच्या घटनेने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
पैठण कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत पाचोड येथे मोसंबीचा प्रसिध्द मार्केट सुरू आहे. त्यामुळे याठिकाणी दररोज शेतकरी तसेच व्यापारीवर्गात हजारो टन मोसंबी खरेदी विक्रीचा व्यवसाय केला जातो. खरेदी केलेल्या मोसंबीला परराज्यातील मोसंबी बाजार पेठेत विक्रीस पाठविले जाते. त्यामुळे शनिवारी रात्री मोसंबीची वाहतूक करण्यासाठी आलेल्या तीन उभ्या ट्रकमधील मध्यरात्रीच्या दरम्यान चोरट्यांनी संधी साधत हजारो लिटर डिझेल काढून लंपास केले.
वाहनधारकांमधून चिंता
पाचोड परिसरातून राष्ट्रीय व राज्य महामार्ग जात असल्याने मोठ्या प्रमाणात दळणवळण असलेल्या रस्त्यांकडे रात्रीच्या वेळेस उभ्या वाहनातून डिझेल चोरी होण्याच्या घटनेत वाढ होत असल्याने वाहन धारकांमधून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सकाळी मोसंबीने भरलेले ट्रक चालकांनी सुरू करण्याचा प्रयत्न केला असता ट्रक सुरू होत नव्हते. त्यामुळे चालकांनी तपासणी केली तर इंधन टँकमध्ये डिझेलच नसल्याचे आढळून आले.