marriage
फर्दापूर : सोयगाव तालुक्यातील पळसखेडा येथे बनावट लग्न (Fake Marriage) लावून पैसे उकळणाऱ्या टोळीचा फर्दापूर पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी दोन पुरुष व पाच महिलांना ताब्यात घेण्यात आले तर एकजण 55 हजार रोख रक्कम घेऊन फरार झाला. लग्नाचे वय झालेल्या तरुणांच्या कुटुंबांना दलालामार्फत लग्न लावून पैसे उकळण्याचे काम ही टोळी करत होती.
एका दीड लाख रुपये वधू किंमत होती, असे समोर आले आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बनावट टोळीच्या माध्यमातून गुरुवारी पळसखेडा येथील दोन तरुणांचे लग्न होणार होते. त्यातील एका तरुणाचे लग्न धनवट शिवारातील वाघूर नदीच्या काठी असलेल्या चौंडेश्वर महादेव मंदिरावर लागले व दुसऱ्या तरुणाचे लग्न हे पळसखेडा येथेच होणार होते. हे आधार बनावट असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्याने घडलेला प्रकार फर्दापूर पोलिसांना कळविला. फर्दापूर पोलिसांनी या बनावट टोळीला ताब्यात घेतले.
तपासणीअंती या टोळीने अनेक लोकांची बनावट लग्न लावून फसवणूक केल्याचे समोर आले. फर्दापूर पोलिसांनी याप्रकरणी आरोपी सिताराम महिपाल सोनवणे (रा. पहूर ता. जामनेर), रोशनी अशोक पवार (रा.नाशिक (खरे नाव पूनिता शंकर कामटे रा.दर्या ता. दरभंगा, बिहार), सुमन प्रकाश जाधव (रा. नाशिक (खरे नाव पूजा अनिल वाल्मिकी रा. हडपसर पुणे), रंजना कैलास आलीस (रा. इंद्रकुंड पंचवटी नाशिक, मीरा अनिल डांगे रा.लोणी खुर्द ता. वैजापूर), रेणुका कमलाकर वस्त (रा. टिटवाळा, कल्याण) यांच्याविरुद्ध संजय बाळाराम साकळे (रा. पळसखेडा) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद केला आहे.
याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सुग्रीव चाटे, पोलीस नाईक निलेश लोखंडे, आनंद पगारे, मकसूद तडवी, योगेश कोळी, खडके, भरत कोळी महिला पोलिस कल्पना चाथे, कविता चाथे आदी कर्मचारी अधिक तपास हे करीत आहे.
आधारकार्डने फुटले बिंग…
याबाबत नाशिक येथून लग्नासाठी आलेल्या नवरदेवाचा पुरुषोत्तम नरोटे यास वधुवर संशय आला व त्याने या बाबतीत त्यांच्याकडे आधार कार्डची मागणी केली. आधार कार्ड हे त्याला संशयास्पद वाटले व त्याने वधूला गावशेजारील वाकोद येथे नेऊन आधारकार्ड बाबतीत शहानिशा केली.