
पिंपरी : पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाकडून शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्याकरिता नियंत्रण कक्षात गुगल मॅप प्रणालीचा वापर सुरु करण्यात आला आहे. सीसीटीव्ही तसेच गुगल मॅपद्वारे वाहतूक कोंडीचे निरीक्षण करून ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. त्या ठिकाणी व संबंधित वाहतूक विभागास वाहतूक नियंत्रण कक्षाद्वारे वायरलेस कॉल देऊन वाहतूक कोंडी सोडविण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात चाकण, भोसरी, तळेगाव ही औद्योगिक क्षेत्रे तसेच हिंजवडी व तळवडे हे आयटी पार्क आहेत. या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांची संख्यही मोठी असून या परिसराचा विकासही झपाट्याने होत आहे. या क्षेत्रांमध्ये काम करणारे कर्मचारी हे आयुक्ताल्याच्या हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्यास असून ते कामास येण्या-जाण्या करिता त्यांचे खाजगी तसेच सरकारी वाहनांचा वापर करत असल्याने वाहतूक कोंडीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या वाहतूक कोंडीमुळे अनेक मानवी तास वाया जात असल्याने वाहतूक सुरळीत व सुरक्षित होऊन गतिमान होण्याकरिता पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखा कटीबद्ध असल्याचे वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सतिश माने यांनी सांगितले.
सीसीटीव्हीद्वारे निगराणी
पिंपरी- चिंचवड शहर हे स्मार्ट सिटी अंतर्गत येत असून शहरातील वाहतुकीवर सीसीटीव्हीद्वारे निगराणी ठेवण्यात येत आहे. परंतु बऱ्याच ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने व कॅमेऱ्यामध्ये ठराविक अंतरावरीलच चित्रीकरण दृश्य होत असल्याने वाहतूक कोंडीचे निरसन करणे जिकिरीचे होत आहे. या निगरानीमध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे व अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे यांनी सूचित केले आहे.
नियंत्रण कक्षाद्वारे वायरलेस कॉल
पिंपरी- चिंचवड वाहतूक शाखेकडील नियंत्रण कक्षात मोठया स्क्रीन बसवून त्यावर सीसीटीव्ही तसेच गुगल मॅप द्वारे वाहतूक कोंडीचे निरीक्षण करून ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. त्या ठिकाणी तसेच संबंधित वाहतूक विभागास वाहतूक नियंत्रण कक्षाद्वारे वायरलेस कॉल देऊन वाहतूक कोंडी सोडवून वाहतूक गतिमान करण्यात येत आहे. या गुगल मॅप अॅपद्वारे वाहतुकीवर निगराणी ठेवण्याकरिता वाहतूक विभागाकडील पोलीस अंमलदार नेमण्यात आले आहेत.