
कर्जतमध्ये पुन्हा हेलिकॉप्टरची हवाई सफर, हेलिकॉप्टर वारीला प्रशासनाचा आशीर्वाद?
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि रेल्वेने मुंबई महानगर प्रदेशाचा महत्त्वाचा भाग असलेल्या कर्जत तालुक्याला गुंतवणूकदार यांनी आपलेसे करायला सुरुवात केली आहे.देशातील आघाडीच्या उद्योगपती यांनी कर्जत मध्ये शेकडो एकर जमिनी खरेदी केल्या आहेत.एका मोठ्या उद्योगपतींची कर्जत तालुक्यात काही हजार एकर जमीन आहे.अशा जमिनीवर गृह प्रकल्प उभारून व्हीआयपी संस्कृती आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.त्यावेळी हेच गुंतवणूकदार ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपल्या काही शे एकर जमिनीच्या परिसरात चक्क हेलिपॅड उभारत आहेत.असे हेलिपॅड भविष्यात कर्जत तालुक्याला मोठ्या संकटात टाकू शकतात. कर्जत तालुक्यात शासनाचा अधिकृत असा एकही हेलिपॅड नाही,मात्र खासगी कंपन्यांचे अनेक हेलिपॅड उभे राहिले आहेत.या हेलिपॅड वर कोण उतरते याची इत्यंभूत माहिती प्रशासनाला असावी अशी एक सर्वसाधारण अपेक्षा कर्जत तालुक्याला जनतेला आहे.परंतु दररोज हेलिकॉप्टर कर्जत तालुक्याच्या हवाई हद्दीत दिसून येत असल्याने हेलिकॉप्टर वारीला प्रशासनाचा आशीर्वाद आहे काय? अशी शंका उपस्थित होत आहे.
प्रदुषण मुक्त आणि शुन्य प्रदूषण असलेल्या तालुक्यात काँक्रीटचे जंगल उभे राहणार आहे. याच निसर्गरम्य तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी बड्या उद्योगपतींचे हेलिकॉप्टर मधून आगमन झाले. देशाच्या आर्थिक राजधानी मधून मुंबई येथून काही मिनिटात कर्जत मध्ये येता येत असेल तर त्यातून अनेक अनुचित प्रकारांना वाव मिळू शकतो.ही बाब प्रशासनाने काळजी म्हणून नोंद घ्यावी अशी असल्याने कर्जत तालुक्यात येणारे हेलिकॉप्टर कोणाचे? याचा शोध प्रशासन घेणार आहे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कशेळे परिसरात कोटक महिंद्रा कंपनीने मोठी जमीन खरेदी केली आहे.त्या ठिकाणी आठवड्यातून किमान एकदा कोटक व्हिला या काही शे एकर जमीन असलेली साईट वर हेलिकॉप्टर घेऊन येत असतात.त्याबाबत कोणतीही नोंद कर्जत महसूल विभागाकडे नसते आणि पोलिसांकडे देखील नसते. कोटक महिंद्रा कंपनीचे बडे अधिकारी किंवा मालक यांचे हेलिकॉप्टर दुपारी कशेळे येथील जमिनीवर बांधलेल्या हेलिपॅडवर उतरले आणि दीड तासांनी हे हेलिकॉप्टर पुन्हा आकाशात झेपावले. म्हणजे त्या हेलिकॉप्टर मधून प्रवास करणारी व्यक्ती रस्ते मार्गाने मुंबई येथून कर्जत येत असल्याने त्यांची हायटेक कार कर्जत येथे पोहचण्याआधी त्यांची हवाई सफर पूर्ण झाली आहे.
अशा प्रकारचे हेलिपॅड शासनाने कोणत्या कामासाठी मंजूर केले आहेत? की ते हेलिपॅड अनधिकृत आहेत? याची कोणतीही माहिती प्रशासनाकडून दिली जात नाही.कर्जत तालुक्यात शासनाने स्वतःचा हेलिपॅड उभारून अन्य ठिकाणी असलेले हेलिपॅड बंद करावेत जेणेकरून अशा हवाई सफरीचे माध्यमातून येणारे व्हीव्हीआयपी यांची नोंद पोलिसांकडे असेल अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी केली आहे.तसेच प्रशासनाने मागील काही महिन्यात कर्जत तालुक्यात खासगी हेलिपॅड वर कोणकोणते व्हीआयपी हेलिकॉप्टर घेऊन आले यांचं माहिती सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे.