शेतकऱ्यांसाठी कृषी उत्सव! आजपासून भारतातील सर्वात मोठ्या ‘किसान’ कृषी प्रदर्शनाची सुरूवात
किसान प्रदर्शनात ६०० हून अधिक कंपन्या, संशोधन संस्था व नवउद्योजक शेतीतील नवीन तंत्रज्ञान व उत्पादने सादर करतील. प्रदर्शनाच्या कालावधीत देशभरातून दोन लाखाहून अधिक शेतकरी भेट देतील असा अंदाज आहे. आधुनिक तंत्रज्ञान व नवे विचार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे हे किसान प्रदर्शनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
यंदा किसान प्रदर्शनात संरक्षित शेती, पाणी नियोजन, कृषी निविष्ठा, यंत्रसामुग्री, पशुधन, जैव, ऊर्जा, वाटिका व शेती लघु उद्योग अशी विभागवार दालने उभी करण्यात आलेली आहेत. प्रत्येक दालनात त्या विशिष्ठ उद्योगातील कंपन्यांचे स्टॉल शेतकऱ्यांना पाहायला मिळतील. शेतीसाठी लागणारी यंत्रे व उपकरणांचे प्रदर्शन खुल्या जागेत आयोजित केले आहे.
किसान प्रदर्शनाला भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचा सहभाग लाभला आहे. तसेच कृषी विभाग महाराष्ट्र राज्य आणि इतर मान्यवर संस्थांचाही सहभाग आहे. (Farmers News)
पूर्वनोंदणी : प्रदर्शनाची पूर्वनोंदणी मोबाईलद्वारे करण्याची सोय आहे. ३०,००० हुन अधिक शेतकऱ्यांनी पूर्वनोंदणी केली असून ही संख्या १००,००० ओलांडण्याची अपेक्षा आहे.
किसान आता मोबाईलवरसुद्धा – प्रत्यक्ष प्रदर्शनातील सहभागासोबतच प्रदर्शक कंपन्या किसान डिजिटल प्लॅटफॉर्मवर देखील त्यांच्या उत्पादनांची यादी प्रसिद्ध करू शकतात. या माध्यमातून प्रदर्शकांची माहिती देशाच्या कानाकोपऱ्यातील १० लाख शेतकऱ्यांपर्यंत पाहोचवण्याचे योजले आहे. या शेतकऱ्यांना अधिक माहितीसाठी कंपन्यांशी संवाद साधणे शक्य होईल.
जागर : किसान जागर हा शेतीतील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जनजागृती निर्माण करण्यासाठी सुरू केलेला एक विशेष उपक्रम आहे.
मातीमोल : मातीच्या आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करणारा उपक्रम योजला आहे. आपली माती जिवंत आहे का? याविषयी विचार करायला उद्युक्त करणे व मातीच्या आरोग्याविषयी जागरूकता वाढवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. हा उपक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील जैवतंत्रज्ञान आणि इतर संबंधित विभागांच्या सहकार्याने संयुक्तपणे राबविण्यात येत आहे.
मनाची मशागत : IPH च्या सहकार्याने शेतकऱ्यांमध्ये मानसिक आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी एक विशेष उपक्रम आयोजित करत आहे. यात शेतकरी समुदायासमोरील ताणतणाव, भावनिक स्वास्थ्य आणि मानसिक आरोग्याशी संबंधित आव्हानांवर लक्ष केंद्रित केले जाईल. तज्ञांशी संवाद आणि मार्गदर्शनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक निरोगी व संतुलित जीवन जगता यावे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
मधमाशीशी मैत्री : मधमाशा शेतीमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रभावी परागीकरणासाठी मधमाश्यांची संख्या वाढणे अत्यावश्यक आहे. ‘बसवंत हनीबी पार्क अँड ट्रेनिंग सेंटर’ यांच्या सहकार्याने परागीकरणाचे महत्व आणि आणि मधमाशांना अनुकूल अशा शेती पद्धतींची माहिती शेतकऱ्यांना दिली जाते.
प्रदर्शकांना आणि अभ्यागतांना व्यावसायिक चर्चा करण्यासाठी बिझनेस लाउंजची व्यवस्था करण्यात आली आहे. यातून कृषी व्यावसायिकांना सहयोग आणि भागीदारींसाठी प्रोत्साहन मिळेल. आंतरराष्ट्रीय उत्पादने आणि व्यवसायाविषयी जाणून घेण्याची संधी अभ्यागतांना मिळेल. किसान प्रदर्शनाविषयी अधिक माहिती kisan.in या संकेतस्थळावर मिळेल.






