
Mahaparinirvan Din 2025: भिमराया घे तुझ्या लेकरांची वंदना...! अमरावतीतून नया अकोल्यात भव्य अभिवादन यात्रा
महापरिनिर्वाण दिनानिमित्त अमरावतीमध्ये पार पडली अभिवादन यात्रा
हजारो अनुयायांनी यात्रेत नोंदवला सहभाग
माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या पुढाकारातून अनेक वर्षे सुरू आहे यात्रा
अमरावती: डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. babasaheb ambedkar)यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अमरावतीतून (Amravati )नया अकोल्याच्या श्रद्धाभूमीकडे निघालेली अभिवादन यात्रा यंदाही उत्साहात पार पडली. बाबासाहेबांच्या विचारांप्रती अपार श्रद्धा व्यक्त करण्यासाठी आयोजित ही यात्रा गेल्या अनेक वर्षांपासून माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या पुढाकारातून पार पडत असून, यावर्षीही हजारो अनुयायांनी सहभाग नोंदवत यात्रेला भव्य स्वरूप प्राप्त करून दिले.
सकाळी इरविन चौकातील बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन करून यात्रेला प्रारंभ झाला. पंचवटी, कठोरा नाका, शेगाव नाका, चांगापूर, वलगाव या मार्गाने बाईक रॅलीचे स्वरूप घेत यात्रा नया अकोला येथील श्रद्धाभूमीवर दाखल झाली. काँग्रेसतर्फे अभिवादन सभेचे आयोजनही करण्यात आले होते.
सभेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राज्यसभा खासदार मुकुल वासनिक, खासदार बळवंत वानखडे, एड. यशोमती ठाकूर, अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामीणचे अध्यक्ष मा. श्री. अनिरुद्ध उर्फ बबलू देशमुख, माजी आमदार विरेंद्र जगताप, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सुनील देशमुख, अमरावती शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू शेखावत आणि अमरावती शहर आणि जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुकुल वासनिक म्हणाले, “चैत्यभूमीवरून बाबासाहेबांचा अस्थी कलश येथे आणून स्थापना करण्यात आल्याने नया अकोल्याला पावन स्थान प्राप्त झाले आहे. यात्रेमुळे भाविकांची संख्या वाढली असून आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करू.”
खासदार बळवंत वानखडे यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, “चैत्यभूमीवर येऊ न शकणाऱ्या अनुयायांना नया अकोल्यातच दर्शनाची सोय व्हावी या प्रामाणिक हेतूने अस्थी कलश आणण्यात आला. बाबासाहेबांच्या विचारांचे जतन काँग्रेसने सातत्याने केले आहे. संविधान हत्या दिन साजरा करण्याचा विचार मांडणाऱ्यांना मी ठाम विरोध केला होता; संविधानाची हत्या चांगल्या व्यक्तीकडून होत नाही—असे काही होत असेल तर ते सत्ताधाऱ्यांकडूनच घडते,” अशी त्यांची टीका होती.
अभिवादन यात्रेच्या प्रमुख प्रेरक यशोमती ठाकूर म्हणाल्या की, “अस्थी कलशाचे मनोभावे जतन अनेक वर्षांपासून होत आले आहे. अभिवादन यात्रेमुळे नया अकोल्याला वेगळे स्थान मिळाले असून बाबासाहेबांच्या विचारांचे संवर्धन व्हावे यासाठी या ठिकाणाचा विकास आवश्यक आहे. तसेच अस्थी कलश आणणाऱ्यांचे आभार मानले”. कार्यक्रमाचे संचालन प्रवीण मनोहर यांनी केले. काँग्रेस, महिला काँग्रेस, एनएसयूआय, विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते तसेच बाबासाहेबांवर अपार प्रेम करणारे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.