नाशिक : राज्यातील जनतेला तीव्र उन्हाचा फटका बसत आहे. खारघरमध्ये याच उष्माघातामुळे (Kharghar Incident) 14 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता नाशिक जिल्ह्यात उष्माघाताने (One Died due to Sunstroke) एका अग्निवीराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. अग्निवीर भरतीसाठी प्रशिक्षण घेत असताना त्याला उष्माघाताचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
हर्षल ठाकरे असे उष्माघाताने मृत्यू झालेल्या अग्निवीराचे नाव आहे. हर्षल हा 21 वर्षांचा असून, तो मूळचा धुळे जिल्ह्यातील होता. त्याची भारतीय लष्करात सेवा करण्याची प्रचंड इच्छा होती. त्यामुळे तो अग्निवीर भरतीसाठी उतरला. नाशिकच्या देवळाली कॅम्पमध्ये त्याचं प्रशिक्षण सुरू होतं. एक जानेवारीला हर्षल ठाकरे हा अग्निवीर म्हणून रुजू झाला होता. गेल्या काही दिवसांपासून कडाक्याचे उन्ह होते. त्यामुळे प्रशिक्षणादरम्यान हर्षल ठाकरे याला उष्माघाताचा त्रास जाणवू लागला. यात त्याचा मृत्यू झाला.
उलट्या आणि ताप सुरु
या उष्माघातामुळे हर्षल ठाकरे याला मोठा त्रास जाणवू लागला. प्रशिक्षण सुरू असतानाच हर्षलला उलट्या आणि तापाचा त्रास सुरू झाला. त्यानंतर हर्षलला आर्टिलरी रुग्णालयात दाखल करण्यात आले. लान्सनायक नरेंद्र सिंग यांनी त्याला रुग्णालयात नेलं. मात्र, तिथे त्याचा मृत्यू झाला.