राज्यातील विविध भागांना मुसळधार पावसानं झोडपलं
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसत आहे. तर काही ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीला पावसाने झोडपून काढले असून, पश्चिम महाराष्ट्रातही सोमवारी मुसळधार पाऊस झाला. राधानगरी धरणातून 2500 क्युसेक विसर्ग करण्यात आला. तर कुंभी धरणाच्या जलविद्युत प्रकल्पातून 300 क्युसेक विसर्ग केला.
पंचगंगा आणि कुंभी नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर कोकणातील जगबुडी, कोदवली, शास्त्री आणि असावी या प्रमुख नद्यांनी इशारा पातळी ओलांडत असून, काही गावांचा संपर्क तुटला आहे. मॉन्सूनपूर्व पावसाच्या तडाख्यानंतर काही काळ पावसाने विश्रांती घेतली होती. गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पाऊस सक्रिय झाला. 24 तासांत महाबळेश्वरमध्ये 158 मिमी पावसाची नोंद झाली.
हेदेखील वाचा : Ahilyanagar News: आम्हाला इच्छामरणाची परवानगी द्या; ९० आदिवासी कुटुंबियांची टोकाची भूमिका
आठ तास वाहतूक ठप्प
मुसळधार पावसामुळे कणकवली-आचरा राज्य मार्गावरील पावसाने पाणी आल्याने सकाळपासून वाहतूक बंद झाली. तब्बल आठ तासांपासून वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, हवामान खात्याने पुण्यातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट दिला आहे. पर्यटकांनी सावधानी बाळगणे गरजेचे आहे. येणाऱ्या तीन ते पाच दिवस असाच पाऊस बरसत राहणार असल्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी आता पेरणी करून घेण्यास हरकत नाही, असा अंदाज आहे.
भुशी डॅम ओव्हरफ्लो
लोणावळ्यातील भुशी डॅम ओव्हरफ्लो झाले आहे. मावळ परिसरात रात्रभर झालेल्या जोरदार पावसामुळे पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आणि डॅम भरून वाहू लागला. या निसर्गसौंदर्याने नटलेल्या दृश्याची झलक पाहण्यासाठी पर्यटकांनी भुशी डॅमवर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली.
विदर्भात मात्र मान्सूनची प्रतीक्षा
छत्रपती संभाजीनगर, परभणी, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण, ठाणे, लातूर, नांदेड आणि कोकणात सध्या पावसाच्या सरी कोसळल्या. भारतीय हवामान विभागाने 24 तासांसाठी पावसाचा ‘रेड अलर्ट’ दिला होता. हवामान खात्यानुसार, विदर्भाच्या काही भागांमध्येच आता मान्सून पोहोचणे शिल्लक आहे.
हेदेखील वाचा : Mumbai Lake Water Level : मुंबई पावसाने भिजली, तरीही तलाव अजूनही तहानलेले, पाणीपुरवठा करणारी धरणं किती रिकामी?