पुणे : बाणेर भागातील एका उच्चभ्रु परिसरात असलेल्या दोन वेगवेगळ्या हॉटेलवर व्हॉट्सअप तसेच इतर सोशल मिडीयाच्या माध्यमातून (ऑनलाईन) चालवल्या जाणाऱ्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा (High profile sex racket) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Pune Police Crime Branch) पर्दाफाश केला आहे. गेल्याच आठवड्यात राजस्थानी अभिनेत्रीसह दोन रशियन मुलींवर कारवाई केल्यानंतर त्यांच्याकडून मिळालेल्या एजंटच्या माहितीवरून पुन्हा सामाजिक सुरक्षा विभागाने (Social Security Department) ही छापेमारी करत कारवाई (Pune Police) केली आहे. बाणेरमधील बड्या हॉटेलवर मध्यरात्री छापेमारीकरून तब्बल ११ मुलींची सुटका करण्यात आली आहे.
ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक भरत जाधव, सहाय्यक निरीक्षक राजेश माळेगावे, अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, इम्रान नदाफ, तुषार भिवरकर, अमेय रसाळ, सागर केकान, राने, मनिषा पुकाळे यांच्या पथकाने केली आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात रॉकी कदम, राहुल मदन उर्फ मदन सन्यासी, दिनेश उर्फ मामा तसेच नविन व रोशन (नावे पुर्ण माहिती नाही) या पाच एजंटवर पिटा अॅक्टनुसार गुन्हा नोंद केला आहे. याबाबत सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलीस हवालदार मनिषा पुकाळे यांनी तक्रार दिली आहे.
शहरातील अवैध प्रकारांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले आहेत. यादरम्यान, सामाजिक सुरक्षा विभागाकडून जोरदार कारवाई केली जात आहे. तत्पुर्वी गेल्या आठवड्यात एका बड्या हॉटेलमध्ये छापेमारीकरत पुणे पोलिसांनी राजस्थानी अभिनेत्री आणि दोन रशियन मुलींची सुटका केली होती. याप्रकरणात गुन्हा नोंद करण्यात आला होता. हे एजंट परराज्यात राहून पुण्यात ऑनलाईनच्या माध्यमातून सेक्स रॅकेट चालवित होते. पुढच्या तपासात काही एजंटची आणखी माहिती मिळाली होती. त्या माहितीवरून पोलिसांनी बनावट ग्राहक तयारकरून त्यांच्याशी संपर्क साधला. तसेच, या माहितीची खातरजमा केली. त्यानूसार, मध्यरात्री बाणेर भागातील एका बड्या हॉटेलवर छापा टाकला. तेव्हा या हॉटलमध्ये ठेवण्यात आलेल्या ११ मुलींची सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी येथून नवी मुंबई येथील एका मुलीसह उत्तरप्रदेश, दिल्ली, पश्चिम बंगाल, गुजरात, मध्यप्रदेश, मुंबई येथील असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्यांची सुटकाकरून त्यांना रेस्क्यु होममध्ये भरती केले आहे.