how and where Dattatreya Gade arrested by pune police swargate molestation case
पुणे : मागील दोन दिवसांपासून पुण्यातील स्वारगेट अत्याचार प्रकरणामुळे वातावरण तापले आहे. पुण्यातील मध्यवर्ती भागामधील स्वारगेट बसस्थानकामध्ये 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आला. फसवणूक करुन तरुणीवर शिवशाही बसमध्ये अत्याचार करण्यात आला. या प्रकरणामुळे परिवहन महामंडळ व पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले जात होते. या प्रकरणामध्ये दोन दिवसांनंतर देखील आरोपी हाती येत नसल्यामुळे पुणे पोलिसांवर मोठा दवाब होता. अखेर रात्री दीड वाजता आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक करण्यात आली.
स्वारगेट आगाराच्या आवारामध्ये घडलेल्या या घटनेमुळे सर्वांना धक्क बसला होता. शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये आणि गजबजलेल्या भागामध्ये महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले. पोलिसांनी आरोपीला अटक करण्यासाठी 11 पथके रवाना केली होती. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री अजित पवार हे या प्रकरणामध्ये लक्ष ठेवून होते. त्याचबरोबर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी देखील येऊन आढावा केला. आरोपी दत्तात्रय गाडेला शोधून देणाऱ्या व्यक्तीला 1 लाख रुपयांचे बक्षिस देखील जाहीर करण्यात आले होते. त्याला अटक करण्यासाठी पोलिसांनी ड्रोनचाही वापर केला. शेवटी त्याच्या गावात एका कॅनॉलच्या खड्ड्यात दत्तात्रय गाडे लपलेला पोलिसांना सापडला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सदर घटनेमध्ये आरोपीची ओळख ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे झाली. आरोपीची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून बसस्थानकांमध्ये चोऱ्या, पाकिटमारी आणि तत्सम गुन्हे करण्यात याआधीही तो पोलिसांच्या रडारवर आला होता, अशी माहिती समोर आली. शोध सुरु झाल्यानंतर आरोपी हा त्याचे गाव असलेल्या शिरुर गुणाट या गावी पळून गेल्याचे समोर आले. त्याच्या फोनचे शेवटचे लोकेशन देखील हेच गाव असल्यामुळे पोलिसांनी गुणाट गावी मोठा फौजफाटा तैनात केला.
पोलिसांना खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी दत्तात्रय गाडे हा ऊसाच्या शेतामध्ये लपून बसला होता. तसेच पोलिसांची 10 पथकं दत्तात्रय गाडेला अटक करण्यासाठी गुणाट गावात दाखल झाली. गुणाट गावामध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा होता. गुरुवारी दिवसभर पोलीस दत्तात्रय गाडेचा शोध घेत होते. यानंतर पोलिसांनी ड्रोनने आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. तसेच श्वान पथक देखील पोलिसांनी आणले होते. रात्रीच्या सुमारास दत्तात्रय गाडे गावात एका नातेवाईकाकडे पाणी पिण्यासाठी येऊन गेल्याची माहिती संबंधित गावकऱ्यांनी पोलिसांना फोन करून दिली. यामुळे आरोपी गुणाट गावामध्ये असल्याची खात्री पोलिसांना झाली.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यानंतर पोलिसांनी ड्रोनच्या सहाय्याने तपास वाढवला. तसेच स्पीकरमधून उद्घोषणा करण्यास सुरुवात केली. मध्यरात्रीनंतरही पोलिसांचा ड्रोन संबंधित उसाच्या शेतावर फिरून आरोपी दत्तात्रय गाडेचा शोध सुरु होता. “ड्रोनने तुझ्यावर लक्ष ठेवलं आहे. तू ताबडतोब जिथे आहेस तिथून बाहेर येऊन पोलिसांना शरण ये. पोलीस तुझ्यावर लक्ष ठेवून आहेत”, अशी घोषणा पोलिसांकडून सातत्याने ड्रोनच्या माध्यमातून केली जात होती. “तू घाबरू नकोस”, असा खोटा दिलासाही पोलिसांनी आरोपीला दिला. त्यानंतर आरोपी दत्तात्रय गाडे हा कॅनॉलच्या खड्ड्यात उभा राहिला. रात्री दीड वाजता अखेर कॅनॉलच्या खड्ड्यातून बाहेर आलेला दत्तात्रय गाडे पोलिसांच्या हाती लागला. आपण बोलल्यानंतर गाडे कॅनॉलच्या खड्ड्यातून बाहेर येऊन उभा राहिल्याचंही शोध घेणाऱ्या एका पोलिसानं नमूद केले आहे.